वातावरण बदलाने दवाखाने ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 10:36 PM2019-09-15T22:36:50+5:302019-09-15T22:37:08+5:30
पाऊस : साथीच्या आजाराने हैराण
धुळे : जिल्ह्यात काही प्रमाणात स्वाइन फ्लू लागन असतांना ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, त्यानंतर पाऊसाची दांडी मध्येच उन्ह अशा वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजाराचे रूग्णांची संख्येत वाढ झाली आहे़
पाऊस उन्ह, गारवा जाणवत असल्याने हवामानातील या बदलचा मानवी आरोग्यावर चांगलाच दुष्परिणाम होत आहे. थंडीताप, सर्दी, खोकला यांसह अनेक साथीचे आजार बळावल्याने रूग्णालयासह खासगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. या बदलत्या वातावरणामुळे अंग मोडून पडणे, निरूत्साह वाटणे, डोके दुखणे अशा विविध समस्यांनी नागरिकांना हैराण झाले आहेत. शहरातील अनेक खाजगी दवाखाने थंडीताप, सर्दी, घसा खवखवणे, अंग दुखणे आदींचे रूग्ण तसेच पावसाच्या पाण्यामुळे कावीळ व डायरीयाचे रूग्ण देखील दाखल होत आहेत़ प्रौढांप्रमाणेच लहान मुलेही या संसर्गामुळे त्रस्त आहेत. हवामानातील बदलामुळेच गेल्या ३-४ दिवसापासून रूग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले़ संसर्गामुळे (व्हायरल इन्फेक्शन) लहान मुलांना या साथीच्या आजाराने बळकावले असून, घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला व तापाच्या आजारांनी त्यांना ग्रासले आहे. लहान मुलांबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे असून, स्वच्छता तसेच शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टराकडून दिला जात आहे़