प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला विकास निधी - डॉ.सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:09 PM2019-03-22T21:09:37+5:302019-03-22T21:09:53+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी कामगिरी हाच प्रचाराचा मुद्दा

Development funds for every village | प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला विकास निधी - डॉ.सुभाष भामरे

प्रत्येक गावापर्यंत पोहोचविला विकास निधी - डॉ.सुभाष भामरे

Next

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित मी मतदारसंघासह देशाचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान दिले. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावापर्यंत विकास निधी पोहोचवून अपेक्षापूर्ती करण्यात यश मिळविले असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व भाजपाचे संभाव्य उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास डॉ.भामरे हे इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पाच वर्षांतील कारकिर्द, निवडणुकीतील मुद्दे यासंबंधी चर्चा केली.
प्रश्न : लोकसभा निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्यांवर लढणार आहात?
डॉ.भामरे : तीन मुद्यांवर मी निवडणूक लढविणार आहे. पहिला म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पाच वर्षांत केलेली लोककल्याणकारी कामे तसेच जागतिक पातळीवर भारताला सन्मान मिळवून देण्यासाठी झालेले प्रयत्न, दुसरा मुद्दा म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी आणि विविध समाजघटकांसाठी केलेली कामे, तिसरा मुद्दा म्हणजे, धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात आलेले यश...हे तीन मुद्दे घेऊन मी पुन्हा मतदारांपुढे जाणार आहे.
प्रश : आपल्या कार्यकाळातील ठळक कामे कोणती?
डॉ.भामरे : मनमाड इंदूर रेल्वे मार्ग, राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्गांचा दर्जा आणि चौपदरीकरण, सुलवाडे-जामफळ योजना, विखरणला सौर उर्जा प्रकल्प, झोडगे येथे पॉलीकॅब फॅक्टरी, नार-पार पाणी योजनेला गती, मालेगावला लॉजिस्टिक पार्क , सटाणा येथील ५ सिंचन प्रकल्प मार्गी, धुळ्याच्या विकास कामांसाठी भरीव निधी ही ठळक कामे आहेत.
प्रश्न : केंद्रीय मंत्रिमंडळात आपण असल्याने त्याचा लाभ या मतदारसंघाला आपण किती करुन देऊ शकलात?
डॉ.भामरे : मंत्रिपदाचा १०० टक्के लाभ या मतदारसंघाला करुन दिला. जी कामे मार्गी लागली, ती अनेक अडचणींमुळे खूप वर्षे प्रलंबित होती. निव्वळ खासदार म्हणून त्याचा केवळ पाठपुरावा करु शकलो असतो. परंतु, मंत्रिमंडळातील सहकारी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती, सुरेश प्रभू, स्मृती इराणी या मंत्र्यांनी मला अमूल्य असे सहकार्य केले.
प्रश्न : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून देश-विदेश पातळीवर आपण प्रतिनिधीत्व केले, कसा होता एकूण अनुभव?
डॉ. भामरे : वैयक्तीक मला आणि या मतदारसंघाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी संरक्षण मंत्रालयात काम करताना करु शकतो, हे माझे सद्भाग्य म्हणावे लागेल. संयुक्त राष्टÑ संघात मी देशाची बाजू मांडली. पाकिस्तानविषयक धोरणांमध्ये देशाची कूटनिती प्रभावी ठरली. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जवान चंदू चव्हाण व विंग कमांडर अभिनंदन यांची सुखरुप सुटका, कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी चाललेले प्रयत्न हे दृष्यस्वरुपात सगळा देश पहात आहे. जगात भारताची नवी ओळख निर्माण करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सैनिकांच प्रश्न सोडविणे तसेच आपत्ती काळात सामान्य नागरिकांना सहकार्य केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
प्रश्न : विकास कामांमध्ये आलेल्या अडथळ्यांविषयी काय सांगाल?
डॉ. भामरे : मी विरोधकांचा आभारी आहे. कारण त्यांनी अडथळे आणि आरोप केले नसते तर ही कामे घेऊन मला जनतेपर्यंत जाण्याची संधी मिळाली नसती. प्रत्येक अडथळा प्रयत्नपूर्वक दूर केला आणि आरोप पुराव्यानिशी खोडून टाकला.

Web Title: Development funds for every village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे