धुळे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता हे अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही, परस्पर निर्णय घेत असल्याच्या कारणावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून तो एकमताने मंजूर केला. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सीईओ शुभम गुप्ता यांच्यावर अविश्वास ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला.
शुभम गुप्ता यांची २३ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कामकाजाविषयी सदस्यांबाबत नाराजी होती. सदस्यांनी मांडलेल्या ठरावात म्हटले आहे की, सीईओ गुप्ता हे दैनंदिन कामकाज करताना तसेच प्रशासकीय व विकासकामांच्या संदर्भात निर्णय घेताना जिल्हा परिषदेतील पीठासीन अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्याशी चर्चा करत नाही. कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय न करता निर्णय घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांची सेवा जिल्हा परिषद प्रशासनास, जिल्ह्यातील ग्रामीण जनतेस हितकारक नाही. त्यांच्या वर्तुणुकीमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सीईओ शुभम गुप्ता यांना अधिकार पदावरून परत शासनाकडे पाठविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव प्रा. संजय पाटील यांनी मांडला. त्याला जिल्हा परिषदेतील ५६ पैकी ५१ सदस्यांनी उभे राहून मंजुरी दिली. पाच सदस्य अनुपस्थित होते.