धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ११० पैकी फक्त १२ बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:31 AM2018-10-09T11:31:47+5:302018-10-09T11:33:17+5:30
अनेकांनी व्यवसाय बंद केल्याचे आरोग्य विभागाला दिले लेखी पत्र
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांविरूद्ध आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करावी असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानंतर गेल्या दोन महिन्यात जिल्हा आरोग्य विभागाने ११० पैकी आतापर्यंत फक्त १२ बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाई केली आहे. दरम्यान कारवाई अजुनही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बोगस डॉक्टर शोधण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टर शोध समिती असून, त्याचे अध्यक्ष गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र आतापर्यंत चारही तालुक्यातील एकाही गटविकास अधिकाºयाने बोगस डॉक्टर शोधला नाही. कारवाई फक्त आरोग्य विभागानेच केलेली आहे.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी २० जुलै १८ रोजी आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. त्यात महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी ३० जुलै २०१८ पर्यंत, तर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी यांनी २० आॅगस्ट २०१८ पर्यंत आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कार्यरत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे असे आदेश दिले होते.
जिल्ह्यात ११० बोगस डॉक्टर
जिल्ह्यात ११० बोगस डॉक्टर होते. या डॉक्टरांकडे कुठल्याही प्रकारची पदवी नव्हती. आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टरांविरूद्ध मोहीम सुरू करून कारवाईचा धडका सुरू केला आहे. मात्र आतापर्यंत धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यात फक्त १२ डॉक्टरांविरूद्धच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अनेकांनी गुंडाळला गाशा
बोगस डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच अनेकांनी गाशा गुंडाळेला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील जवळपास ३० जणांनी आम्ही वैद्यकीय व्यवसाय बंद केला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाला लेखी स्वरूपात कळविले आहे. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाºयांमध्ये बंगालींचे प्रमाण जास्त होते.