शिरपूर फॅक्टरी स्फोटात बेपत्ता कामगाराचा शोध दुस-या दिवशीही सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 10:59 PM2019-09-01T22:59:04+5:302019-09-01T22:59:57+5:30
दोघा मंत्र्यांकडून पाहणी, चौकशीचे दिले आदेश
शिरपूर : वाघाडी-बाळदे गावांदरम्यान असलेल्या केमिकल फॅक्टरीत अचानक झालेल्या स्फोटात १३ जण ठार झाले असून दुसºया दिवशी उशिरापर्यंत बेपत्ता कामगाराचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, सदर फॅक्टरीतील केमिकल्स तातडीने तेथून हलवून अन्य ठिकाणी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रशासनाला दिल्यात़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़
घटनेच्या दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी सकाळपासून पुन्हा बेपत्ता कामगारांचा शोध मोहिमेला सुरूवात झाली़ जेसीबी मशिनद्वारे कंपनीतील जळीत झालेला लोखंडी अवशेष बाजूला करण्याचे काम सुरू होते़ कंपनीच्या लिफ्टजवळ काम करीत असलेला केमिस्ट दुर्गेश विश्वास मराठे (२३) रा़वाघाडी याचा शोध घेण्याचे काम सुरू होते़ मात्र सायंकाळ उशिरापर्यंत मिळून आला नव्हता़ या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पैकी ७ जण हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत ६ जण हे बाहेरील वसाहतीतील कुटुंबातील आहेत़ जखमी ७२ पैकी ४६ हे कंपनीतील कामगार तर उर्वरीत २६ हे बाहेरील आहेत़ कंपनीत स्फोट झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) २ पथक दाखल झाले असून यात ७ अधिकारी व ६५ जवान आहेत़ मदत कार्य करतांना पथकातील चार जवान विजय साहेबराव दाभाडे, सोनल प्रल्हाद चौधरी, किरण आसाराम धनगर व निलेश मोराणकर असे चार जवान जखमी झाले आहेत़
सदर केमिकल्स अन्य जागी हलवून त्यांचा पंचनामा झाल्यानंतर कंपनीचे अधिकारी भिवंडी येथे केमिकल्स नेणार असल्याचे कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर डॉ़संजय वाघ यांनी सांगितले़ या स्फोटाच्या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी एटीएसचे पथक माहिती घेत आहे़ घटनास्थळी काय चाललं आहे याची पहाणी करण्यासाठी तरूणाईसह अनेकांनी रस्त्यालगत मोठी गर्दी केली आहे़ विविध विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासन ठाण मांडून आहेत़
मंत्र्यांकडून भेट आणि चौकशीचे आदेश
वाघाडी, ता. शिरपूर येथील रासायनिक कंपनीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाची सर्वंकष, सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार चौकशी करण्यात येईल. या स्फोटातील दोषींची गय केली जाणार नाही. मदत व बचाव कार्य सुरू असून त्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल रविवारी सकाळी धुळे जिल्हा दौºयावर आले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
धुळ्यातही भेट
मंत्री महाजन, मंत्री रावल यांनी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जावून वाघाडी येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली.