बॅँक खात्यात मोबदल्याची रक्कम भरताच नरेंद्र पाटील टॉवरवरून खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 09:22 PM2018-12-07T21:22:20+5:302018-12-07T21:22:52+5:30
आरटीजेएसद्वारे भरणा : नऊ तासांनंतर प्रशासनाने सोडला निश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा / शिंदखेडा : मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या बॅँक खात्यात आरटीजेएसद्वारे ५ लाख ८८ हजार रुपये भरल्यानंतर नरेंद्र पाटील मोबाईल टॉवरवरून रात्री ८ वाजेच्या सुमारास खाली उतरले. त्यामुळे ९ तासानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तो न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देत ते शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून बसले होते. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले होते. गावातील रस्त्यालगत असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसल्याने व महाजेनकोकडे प्रलंबित रकमेची मागणी केली. प्रशासनाकडून लवकरच पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याबाबत लेखी पत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, असा इशारा त्यांनी प्रशासनास दिला होता. या मुळे त्या परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. लगेच या प्रकरणी जिल्हा प्रशासनामार्फत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविण्यात आले. बराच काळ चर्र्चा झाल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी आठ दिवसांत पैसे पाटील यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रशासनामार्फत दिले. मात्र पाटील यांनी अविश्वास दर्शवत याबाबत लेखी पत्राची मागणी केली.
रात्री आठ वाजता टॉवरवरून पाटील उतरले खाली
अखेरीस सदर रक्कम महाजेनकोकडून आरटीजेएसद्वारे नरेंद्र पाटील यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले. तसेच उर्वरीत मागण्या वरिष्ठ स्तरावरून सोडविल्या जातील याबाबत अपर तहसीलदार डॉ.देवरे यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले. तसेच जमा केलेली रक्कम खात्यात दिसण्यासाठी दोन दिवस लागतील, अशी माहिती त्यांचा मामेभाऊ विलास पाटील यांना दिली. त्यांनी टॉवरवर चढून पाटील यांना त्याबाबत सांगितले. अखेरीस आठ वाजेच्या सुमारास पाटील हे स्वत:च टॉवरवरून खाली उतरले. त्यांना लगेच रूग्णवाहिकेद्वारे तपासणीसाठी नेण्यात आले.
दीर्घकाळ चाललेल्या चर्चेला अखेर यश
नरेंद्र पाटील मोबाईल टॉवरवर चढल्याचे कळताच दोंडाईचाचे अपर तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नायब तहसीलदार यु.एस. खैरनार यांनी सातवेळा्र पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. महाजनको कंपनी नरेंद्र पाटील यांना ५ लाख ८८ हजाराचा धनादेश देण्यास तयार आहे. तो धनादेश लवकरच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना देण्यात येईल. म्हणून त्यांनी खाली येऊन चर्चा करावी, असे आवाहन अधिकाºयांनी केले. परंतु मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मला लेखी पत्र द्यावे या मागणीवर पाटील ठाम होते. ते टॉवरवर सुमारे १२० फूट उंचीवर बसले आहे.जर अधिकारी टॉवरवर आले तर मी खाली उडी मारेल, असा इशारापाटील यांनी दिल्याने सर्व अधिकारी खालूनच त्यांच्याशी संवाद साधत होते. खाली ग्रामस्थांची गर्दी झाली होती. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशामक बंब व पोलिसांचे पथक तेथे तैनात होते. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. त्यास यश येऊन तत्काळ बॅँक खात्यात पैसे भरल्याने पाटील यांनी अखेर ८ वाजता खाली उतरण्याचा निर्णय घेतला.