धुळे महापालिकेच्या कचरा संकलनाचा ठेका स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:48 PM2018-03-24T12:48:50+5:302018-03-24T12:48:50+5:30
मनपा आयुक्तांचे आदेश : ठेकेदारास खुलासा सादर करण्याचे तर यंत्रणेला कचरा संकलनाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका कार्यक्षेत्रात चार झोनपैकी झोन क्रमांक २ वगळता उर्वरीत तीन झोनमधील कचरा संकलनाचा ठेका स्थगित ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी दिले. तसेच १५ दिवसांत खुलासा मागविला आहे. तो प्राप्त न झाल्यास संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला. तीन झोनमधील कचरा मनपा यंत्रणेकडून संकलित केला जाणार असून त्यात अडथळा आणल्यास आपल्या व संबंधित कर्मचाºयाविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही ठेकेदारास आदेशान्वये दिला आहे.
घनकचरा संकलनाचे काम निविदा व करारनाम्याप्रमाणे होत नसल्याने दंडात्मक कारवाई केली. तसेच १९ मार्चपासून पूर्वसूचना न देता काम बंद केले. समक्ष बोलवून संधी दिली. मात्र तयारी न दाखविल्याने १५ दिवसाच्या आत समाधानकारक व आवश्यक कागदपत्रासह खुलासा सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे. यापूर्वीच्या नोटिसींचा खुलासाही ठेकेदाराने सादर केलेला नाही.
कचरा संकलनाचा ठेका स्थगित केलेल्या झोनमधून नियमित कचरा संकलित करण्याचे काम आता मनपाच्या यंत्रणेमार्फत केले जाणार असून आयुक्तांनी तसे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. या कामात ठेकेदार किंवा त्यांनी नेमलेल्या कर्मचाºयांनी अडथळा केल्यास त्यांच्याविरूद्ध तुमच्या स्तरावर गुन्हा दाखल करावा. तसेच कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले तर तुमच्याविरूद्धही कार्यवाही केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.
ठेकेदाराने कचरा संकलनकर्त्या घंटागाडी चालक व सफाई कामगारांचे वेतन पाच महिन्यांपासून थकविले आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.