केमिकल फॅक्टरीत स्फोट; १३ ठार ५८ जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 02:19 AM2019-09-01T02:19:55+5:302019-09-01T02:20:16+5:30
५८ जखमी । मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
धुळे/शिरपूर : शिरपूर तालुक्यातील वाघाडी-बाळदे या गावाजवळील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात १३ जण ठार तर ५८ जण जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सकाळी ९़४० वाजता सर्वात मोठा स्फोट झाल्यामुळे परिसरातील लोक घाबरून गेले. दुसरा स्फोट १०़१८ वाजता, तिसरा व चौथा स्फोट १०़२३ वाजता असे चार स्फोट झाले मात्र, ते लहान होते़ फॅक्टरीखालीला टाकीचा स्फोट होण्याच्या शक्यतेने वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ती शक्यता मावळल्याने ग्रामस्थ गावात परतले आहेत. मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी ११ जणांची ओळख पटली असून एकाची मात्र ओेळख पटलेली नाही. या घटनेत ५८ जण जखमी झाले आहेत. मयत मनोज कोळी कंपनीच्या आवारात होते. उरलेले मृत त्यावेळी कंपनीबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये असताना मरण पावले़ आग विझविण्यासाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतील महापालिका व नगरपालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले. स्फोटामागे घातपात तर नाही ना, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी एटीएसचे पथक पोहचले आहे. त्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यात दुपारपर्यंत यश मिळाले. सर्व जखमींवर शिरपूर उपजिल्हा व धुळे जिल्हा रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. स्फोटीची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे तसेच जिल्हाधिकारी आदींनी तिथे भेट दिली.
मृतांची नावे : पूनमचंद प्रल्हाद गुजर, उज्जैनसिंग राजपूत, मुकेश गोपाल माळी, मनोज सजान कोळी, किशोर मुरलीधर शेवलेकर, पिनाबाई जितेंद्र पावरा, रोनशी जितेंद्र पावरा, सुनिताबाई उर्फ पंजाबाई विशाल पावरा, प्रिया उर्फ प्रियंका सुभाष पावरा, सुबीबाई उर्फ प्रमिला रमेश पावरा, सुपीबाई रमेश पावरा ही मृतांची नावे आहेत. धुळे येथे ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले़
स्फोटांच्या मुळाशी
‘इझ आॅफ डुइंग बिझनेस’
कारखान्यांमधील स्फोटांच्या संख्येत वाढ झाली असून त्याच्या मुळाशी सरकारच्या ‘इझ आॅफ डुईंग बिझनेस’चा अतिरेक असल्याचे समोर येत आहे. शनिवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर ही बाब आणखीच अधोरेखित झाली आहे.