कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:03 PM2019-12-15T22:03:48+5:302019-12-15T22:04:12+5:30
मुकटी : अकस्मात मृत्यूची नोंद
धुळे : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुकटी (ता. धुळे) येथील ६० वर्षीय शेतकºयाने राहत्या घरातच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शनिवारी रात्री त्यांनी विष घेतल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता़
मुकटी येथील जगन नवल पाटील (६०) यांच्याकडे सव्वादोन बिघे शेती होती़ शेतीवरच त्यांच्या परिवाराची उपजिविका सुरू होती. त्यांनी गाडे व बैलजोडी घेण्यासाठी त्यांनी सेंट्रल बँकेकडुन पंचवीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेतले होते़ त्या कर्जाची रक्कम व्याजासह आजपर्यंत साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत झाली होती़ घेतलेले कर्ज फेडले न गेल्याने, ते नेहमी बैचेन राहत होते. तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले़ लागवडीचा उत्पादन खर्चही निघू शकला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने त्यांना नैराश्य आले.
१४ डिसेंबरच्या रात्री घरातील कुटुंबियांना त्यांनी कर्जाविषयी माहिती दिली़ त्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेल्यावर जगन पाटील यांनी फवारणीचे विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपविली़ त्यांनी आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले़ रविवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.