माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ६२ लाखांचा निधी संकलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:34 PM2020-12-28T22:34:14+5:302020-12-28T22:34:30+5:30

जिल्हाधिकारी : ध्वजदिन निधीत सढळ हाताने मदत करणे नागरिकांचे कर्तव्य

Funds of Rs. 62 lakhs collected for the welfare of ex-servicemen | माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ६२ लाखांचा निधी संकलीत

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ६२ लाखांचा निधी संकलीत

Next

धुळे : ध्वजदिन निधी संकलनासाठी धुळे जिल्ह्याला यावर्षी ६१ लाख १८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाले असून ६२ लाख ८२ हजार रुपये इतका निधी संकलन झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी दुपारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, ‘एसटी’च्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, महसूल तहसीलदार मिलिंद कुलथे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी देशात सात डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. देशाच्या संरक्षणासाठी ज्या सैनिकांनी प्राणार्पण केले आहे, अशा जवानांच्या कुटुंबीयांचे जीवन सुसह्य व्हावे तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनवर्सनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. सैनिकांनी देशाप्रती दिलेल्या योगदानाची परतफेड होवू शकत नाही. मात्र, त्यांच्या मदतीची एक संधी आपल्याला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे या निधीस सढळ हाताने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी गायकवाड यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात एक हजार ८४६ माजी सैनिक आहेत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सैनिक कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. धुळे जिल्ह्यास यावर्षी ६१ लाख १८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाले असून ६२ लाख ८२ हजार रुपयांचे संकलन करण्यात आले. यापुढेही ध्वजदिन निधीसाठी मदत करावी, असेही आवाहन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजदिन निधी संकलनास मदत केली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे लिपिक सरोदे, कल्याण संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील, संजय पगारे आदींनी संयोजन केले. वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Funds of Rs. 62 lakhs collected for the welfare of ex-servicemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे