धुळे शहरात जुने धुळे परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:09 PM2018-04-16T15:09:05+5:302018-04-16T15:09:05+5:30
पांझराकाठच्या रस्त्यांना होता अडथळा, धार्मिक स्थळे जमिनदोस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या अकरा किमीच्या रस्त्यांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील अतिक्रमणे सोमवारी चोख पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आली़ धार्मिक स्थळांसह स्मशानभूमीचा त्यात समावेश होता़
आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत़ या रस्त्यांच्या कामांना जुने धुळे परिसरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमी व त्यालगत असलेली मंदिरे, दर्गा यांचा अडथळा ठरत होता़ त्यामुळे संबंधित अतिक्रमणे काढण्यासाठी आमदार अनिल गोटे हे ३० मार्चला रात्री बांधकाम विभागाच्या पथकासह पोहचले असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी व परिसरातील नागरिकांनी त्यांना विरोध केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेने मोर्चाही काढला होता़ दरम्यान, सोमवारी जुने धुळयातील अतिक्रमण अखेर हटविण्यात आले़ या कारवाईपूर्वी पोलीसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा़शरद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात जेसीबी, ट्रॅक्टरसह सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जुने धुळे परिसरात दाखल झाले़ सुरूवातीला नागरिकांसह महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे विरोध मावळला़ त्यानंतर स्मशानभूमीच्या जागेसह धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले़ या कारवाईवेळी बरीच गर्दी झाली होती़ सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते़