धुळे : शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने किसान सुविधा ॲप सुरू केले आहे. मात्र या ॲपवर उशिरा माहिती मिळत असल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात वादळ-वाऱ्याचा इशारा या ॲपवर वादळ होऊन गेल्यावर मिळाल्याने ॲप वेळोवेळी अपडेट होत नसल्याचे सिध्द झाले आहे.
गेल्या आठवड्यात ताैक्ते चक्रीवादळ आले होते. वादळाचा मार्ग धुळे जिल्ह्यातून नसला तरी त्याच्या प्रभावामुळे दोन दिवस जोरदार वारे वाहत होते आणि काही भागात मुसळधार पाऊस देखील झाला. सुदैवाने शेतांमध्ये पिके नसल्याने नुकसान झाले नाही. परंतु काही गावांमध्ये घरांची पडझड झाली.
वादळाचा इशारा ॲपवर उशिरा मिळाला असला तरी शासनाने प्रसारमाध्यमांतून सावधानतेचा इशारा दिला होता. कृषी विभागाने देखील गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांना सावध केले होते.
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
किसान सुविधा ॲपवर हवामानाबद्दल माहिती मिळते. त्यामुळे पिकांचे संरक्षण करता येते.
या ॲपवर कृषी निविष्ठांची देखील माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही.
शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती मिळते. कोणत्या मार्केटमध्ये काय भाव आहे हे कळते.
पीक संरक्षण आणि तज्ज्ञांचा सल्लादेखील या ॲपवर मिळतो.
अपडेट वेळेत मिळावे...
किसान सुविधा ॲपवर अपडेट वेळेत मिळायला हवे. तरच त्याचा उपयोग होईल.
कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन माहिती शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होणे गरजेचे आहे.
अपडेट वेळेत मिळाले तर शेतकरी देखील अपडेट होतील आणि त्यांचा फायदा होईल.
इशारा मिळाला पण, वादळ येऊन गेल्यानंतर !
तौक्ते चक्रीवादळ जिल्ह्यात आले नसले तरी त्याच्या प्रभावामुळे वादळी वारे वाहत होते. या वादळाची माहिती ॲपवर उशिरा मिळाली. परंतु शासनाने वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा पाच दिवस अगोदरच दिला होता. त्यामुळे शेतीसह पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. कृषी विभागाने गावात निरोप पाठविला होता.
- श्रीराम बोरसे, हतनूर
किसान सुविधा ॲपवर उपयुक्त माहिती मिळते. आम्हाला बरेच काही शिकायला मिळते. आमच्या गावाकडे वादळाचा फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे नुकसान झाले नाही.
- संदीप पाटील, बाम्हणे
मोबाईल ॲपपेक्षा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वादळाबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. तसेच टीव्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये देखील अगोदरच बातम्या आल्या होत्या. त्यामुळे आम्ही सावध झालो. परंतु ॲपवरदेखील वेळेवर माहिती मिळायला हवी. उशिराने माहिती मिळण्याचा काही उपयोग होत नाही. या ॲपमुळे शेतकरी साक्षर होण्यास मदत होत आहे.
- दिनेश बैसाणे, चिलाणे
धुळे जिल्ह्यात वादळ आले नाही. वादळाच्या प्रभावामुळे वारे वाहत होते. शासनाने चार दिवस अगोदरच प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सावधानतेचा इशारा दिला होता. शिवाय कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीपर्यंत याबाबत माहिती देऊन सावध केले होते. जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले नाही. शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करीत आहेत. शेतकऱ्यांना वेळाेवेळी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते.
- विवेक सोनवणे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी