शेतातून अवैध गौणखनिज उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:13 PM2019-12-14T23:13:53+5:302019-12-14T23:14:22+5:30

शेतकऱ्याची पोलिसांकडे धाव । चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी

Invalid secondary mineral excavation from the field | शेतातून अवैध गौणखनिज उत्खनन

Dhule

Next

साक्री : सरवडफाटा ते कोंडाईबारीपर्यंत होणाºया रस्त्याच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच या रस्त्यासाठी अनधिकृतपणे किती गौणखनिज वापरले गेले आहे, याच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातून अनधिकृतपणे गौणखनिज उत्खनन झाले आहे त्या शेतकºयाने निजामपूर पोलिसांकडे धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरवड ते कोंडाईबारी या महत्वाकांक्षी रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे हे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले असून या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम माती व दगडाची आवश्यकता असल्याने कंपनीने साक्री तहसीलदार यांच्याकडे गौणखनिजसाठी मागणी दाखल केली होती. त्यानुसार महसूल विभागाने विहीरगाव, वासखेडी, रोजगाव, जामकी, होडदाणे येथून ठराविक गटामधून गौणखनिज उत्खननास परवानगी दिली होती, असे असतानाही ठेकेदार कंपनीने काही गावगुंडांना हाताशी धरून शेतकºयांच्या शेतातून अनधिकृतपणे उत्खनन सुरू केले होते. त्यापैकी निजामपूर येथील पोपट गोटू वाणी यांच्या रोजगाव शिवारातील गट नंबर ८९/२ मधून चांगली माती काढून नेली आहे. शेतात आता फक्त दगड-धोंडे शिल्लक राहिले असून याविरोधात शेतकºयाने साक्रीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली असता, त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.
त्यानंतर सदर शेतकºयाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याविषयी ‘लोकमत’ वृत्त दिल्यानंतर शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. निजामपूर येथील तलाठी व सर्कल यांनी शेतजमिनीचा पंचनामा केला असून तसा अहवाल साक्री तहसीलदार यांना सादर केला आहे. यावर आता तहसीलदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात शेतकरी भुषण पाटील यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली असून संबंधितांचे जाबजबाब घेण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकºयांची जमीन कंपनीने खोदून नेली आहे, त्यांनी सरवड ते कोंडाईबारी या रस्त्याचे जेवढे काम झाले आहे त्यासाठी कुठून गौणखनिज उपलब्ध केले आहे याची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्याची मागणी लावून धरली आहे.

Web Title: Invalid secondary mineral excavation from the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे