जैताणे, देवभाने शिवारात आग, गहू जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:31 PM2019-03-24T12:31:17+5:302019-03-24T12:32:03+5:30
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट
जैताणे/तिसगाव : जिल्ह्यातील जैताणे व देवभाने शेतशिवारात आग लागून गहु जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
जैताणेत ५० क्विंटल गहु खाक
साक्री तालुक्यातील जैताणे शिवारातील सुहासचंद्र विष्णुदास शाह यांच्या शेतात २२ रोजी रात्री अचानक आग लागून शेतात कापून ठेवलेला ५० क्विंटल गहू जाळून खाक झाला.
शाह यांचे शेत संतोष बाविस्कर हे निम्मे हिश्श्याने करतात. त्यांच्या शेतातली तयार ५० क्विंटल गहु कापून गरी करुन रचून ठेवण्यात आला होता. २२ रोजी रात्री शेतात कुणी नसताना या गरीला आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. २३ रोजी संतोष बाविस्कर यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. निजामपूर पोलीस स्टेशनचे हे.कॉ.जयराज शिंदे व वामन चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निजामपूर पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
देवभानेला २ एकरावरील गहु खाक
धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील गट नंबर ५५३ मधील मुरलीधर भिवसन पाटील यांचे शेत तिसगाव ढंडाने येथील भगवान रावण पाटील यांनी निम्मे हिश्श्याने पेरणीसाठी घेतले आहे. त्यांनी ४ एकरवर गहू पेरणी केली होती. २३ रोजी लोंबकळणाºया विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन दोन एकर क्षेत्रावरील गहु जळून खाक झाला.
ही घटना शेजारील शेतात काम करणाºया वण्या भिल यांनी पाहून आरडाओरड केली. मात्र, कोरडा गहू असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि गहु जळून खाक झाला. आग विझवेपर्यंत सुमारे दोन ते अडीच एकर क्षेत्रावरील गहू जळून खाक झाला आहे.
याबाबत शेतकरी भगवान पाटील यांनी सांगितले की, शेतामध्ये गहू पिक घेण्यासाठी २२ ते २५ हजार रुपये खर्च झाला आहे. रात्र-दिवस पाणी भरण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. मात्र, लोंबकळणाºया विजेच्या तारांमुळे हात तोंडाशी आलेला घास असा हिरावला जाईल, अशी धास्ती होती. यामुळे वारंवार सांगूनही विजेच्या लोंबकळणाºया तारा ओढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ऐन दुष्काळामध्ये मोठे नुकसान झाले आहे.