अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या दुसऱ्यादिवशीपासून रामललाच्या दर्शनासाठी राम मंदिरात मोठी गर्दी होत आहे. तर, अयोध्या नगरीतही रामभक्तांचा मेळा जमल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने रामभक्तांना दर्शनासाठी फेब्रुवारी महिन्यात येण्याचं आवाहनही केले होते. त्यानुसार, आता देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येला भाविक जात आहेत. विशेष म्हणजे या भाविकांसाठी विशेष रेल्वे आणि बससेवाही सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही महाराष्ट्रातून थेट अयोध्येला जाणारी बससेवा सुरू केली आहे.
एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा आज १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. विदर्भातील धुळे जिल्ह्यातून ही बस थेट अयोध्येसाठी रवाना होत आहे. आज पहाटे धुळे बस स्थानकातून पहिली बस अयोध्यकडे रवाना झाली. या पहिल्या बससेवेतच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी, धुळे परिवहन विभागाचे अधिकारी पोलीस आणि प्रवाशांनी पहिल्या बसचा आनंद साजरा केला.
अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेकडून विशेष धार्मिक पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दर्शन यात्राही सुरू करण्यात आली आहे. तर, खासगी बससेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही अयोध्येला लक्झरी बसने जाता येते. मात्र, आजही प्रवाशांना राज्य शासनाच्या एसटी महामंडळावरील प्रवासावर मोठा विश्वास आहे. सुरक्षित आणि उत्तम प्रवास म्हणून लालपरी ओळखली जाते. म्हणूनच, कुठल्या नवीन प्रवासासाठी लालपरी आहे का, याची माहिती प्रवाशांकडून घेतली जाते. आता, विदर्भ आणि खान्देशातील प्रवाशांना धुळ्यातून थेट अयोध्येला बसने जाता येईल.
धुळ्याहून निघालेली ही बस तब्बल २० तासांचा प्रवास करुन १६०० किमी अंतर कापणार आहे. या बसने अयोध्या प्रवासासाठी ४ हजार रुपये इतके भाडे प्रवाशांकडून आकारण्यात येत आहे. प्रवाशांना बसमध्ये विशेष सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. या सोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील या बस मध्ये असणार आहेत. चार ते पाच दिवसांचा हा अयोध्या दर्शनचा प्रवास असणार आहे.
धुळे ते अयोध्या, वाराणसी
धुळ्याहून ही १० फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता निघाली असून १२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोहचेल. त्यानंतर, १२ तारखेला अयोध्यातून वाराणसीला जाईल. वाराणसीतील प्रयागराज मुक्कामी बस असणार आहे. दुसऱ्यादिवशी सकाळी प्रयागराजहून धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. अशी माहिती धुळे परिवहन विभागातर्फे देण्यात आली आहे. धुळ्याहून अयोध्येला जाण्यासाठी ४,५४५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.