धुळे : येथील डॉ. आशिष पाटील यांनी केलेल्या शस्त्रक्रियेची दखल आशिया ऑफ बुक रेकॉर्डने घेतली असून त्यांना सन्मानित केले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ५० वर्षीय पुरुषाच्या मुत्राशयातून सुमारे किलोभर वजनाचा व नारळाएवढ्या आकाराचा मुतखडा काढला होता. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. संपूर्ण भारतातून एखाद्या रुग्णाच्या मुत्राशयातून एवढा मोठा मुतखडा काढण्याची ही पहिलीच वेळ असल्याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील रहिवासी रमण चौरे पोटदुखीने त्रस्त होते. डॉ. पाटील यांनी तपासणी केल्यानंतर ओपन शस्त्रक्रियेद्वारे मुतखडा काढण्याचा निर्णय घेतला. मुतखडा काढल्यानंतर चौरे यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मुतखडा वाढण्याची वाट पाहू नये, लवकर निदान करून उपचार घ्यावेत. मुतखड्याचा आकार लहान असतो तोपर्यंत लक्षणे दिसतात. मुतखड्याचा आकार मोठा झाल्यानंतर लक्षणांची तीव्रता कमी होते तसेच त्याचा आकार व वजन वाढत राहते व गुंतागुंत निर्माण होते, अशी माहिती डॉ. आशिष पाटील यांनी दिली.