म्हैसूर बँक चोरी प्रकरणात धुळ्याचा संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:14 PM2018-10-05T13:14:46+5:302018-10-05T13:15:58+5:30
दोन कारही जप्त : धुळे एलसीबीची मिळाली मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील बँकेत सोने लुटून नेल्याची घटना घडली होती़ यात तेथील पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे़ त्याच्या चौकशीतून कर्नाटक पोलिसांचे पथक धुळ्यात आले आणि एका संशयिताला ताब्यात घेतले़ ही घटना मंगळवार २ आॅक्टोबर रोजी रात्री घडली़ यात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाची याकामी मोठी मदत मिळाली आहे़
कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे बँक आॅफ कर्नाटक आहे़ या बँकेत चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटून नेलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४ कोटींच्या आसपास होती़ तेथील पोलिसांनी शोध घेऊन एकाला संशयावरुन ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता महाराष्ट्रातील धुळ्यात त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आणि त्यात रशीद शेख शफिक (रा़ अंबिकानगर, धुळे) याचे नाव समोर आले़ मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हैसूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे १ अधिकारी आणि ३ कर्मचाºयांचे विशेष पथक धुळ्यात आले़ त्यांनी ही माहिती धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली आणि त्यांच्याकडे मदत मागितली़ त्यानुसार प्रकरण समजून घेत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुनील विंचुरकर, रफिक पठाण, गौतम सपकाळे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, राहुल सानप या पथकाने शहरातील अंबिका नगरातील त्या घराजवळ जावून सापळा लावला़ संशयित रशीद शेख शफिक याला त्याच्या घरातून मंगळवार २ आॅक्टोबर रोजी रात्री ताब्यात घेतले़ त्याच्याकडून एमएच १८ बीएच ४८८८ आणि एमएच २१ सी १९२४ अशा दोन कार देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत़ म्हैसूर येथील आलेल्या पोलिसांच्या पथकाने संशयित रशीद शेख शफिक याला तपासकामी ताब्यात घेतले आहे़