धुळे : केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणला असून, हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना आहे. एक वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या २०१ अटीपैंकी २०० अटी आम्ही स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचे दर्शन, लवलेशदेखील या आणलेल्या तीनही कायद्यांमध्ये नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर आगपाखडदेखील केली.अनिल गोटे म्हणाले, सेना आणि हवाईदलातील सेवानिवृत्तीनंतर शेती करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोदी-शहांचा कायदा कळालेला नाही. देशाचे दुर्दैव आहे की सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजधानीच्या सीमेवर दीड कोटी शेतकरी एक लक्ष वीस हजार ट्रॅक्टर घेून रक्त गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.आज त्यांचा ३२वा दिवस आहे. रक्त गोठवणाऱ्या जीवघेण्या थंडीत कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्यावर निदर्यतेने थंडगार पाणी फवारले जात आहे. मोदी-शहा सरकारचे शेतकऱ्यांना त्यांच्या निश्चयापासून विचलित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, चिनी आतंकवादी संबोधले, हे कुठल्याही सुसंस्कृत नागरिकास शोभा देणारे नाही.आंदोलक शेतकऱ्यांमागे चीन आणि पाकिस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने राज्यात गणपत पाटलानंतर रावसाहेब दानवे यांच्याइतका विनोदी, विदुषक दुसरा कोणीच नाही. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसून करतात तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या मालकांना खुश करण्याकरीता भाजपचे पाळीव पोपट हे एकाचवेळेस पोपटपंची करीत सुटले आहेत. नेमका आणलेला हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय, हे सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देशातल्या शेतकऱ्यांना आजवर कोणीही समजून सांगितलेला नाही.कोरडवाहू किंवा चारमाही बागायत करणाऱ्या शेतकऱ्याचे कांदा हे एकमेव मनीक्रॉप आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळू लागताच कांद्यावर निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले. देशातील भाजप सरकारने जगासमोर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशी टीका गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:53 PM