ढोलताशांचा गजरात नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:57 AM2019-04-07T11:57:40+5:302019-04-07T11:58:53+5:30
पहिला मुहूर्त : घरे, दुचाकी-चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सोनेखरेदीचाही उत्साह
धुळे : शहरात सर्वपक्षीय समितीतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही गुढी पाडव्याच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून संध्याकाळी ७ वाजता या शोभायात्रेस प्रारंभ झाला. परंपरेने ठरलेल्या मार्गावरून शोभायात्रा निघाली. जुने धुळ्यातील गल्ली नं.१४, नेताजी सुभाष पुतळा, गल्ली नं.६, घड्याळवाली मशीद, तेथून आग्रारोड मार्गे श्रीराम मंदिराजवळ या शोभायात्रेचा रात्री समारोप झाला.
एकविरा देवी पालखी
नहेमीप्रमाणे यंदाही शोभायात्रेत खान्देश कुलस्वामिनी श्रीएकवीरादेवी पालखी काढण्यात आली. सोबतच आदिवासी समाजबांधवांचे लेझीम पथकाकडून लाठी-काठीचे प्रात्यक्षिक तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची तलवार बाजीचे प्रात्यक्षिक हे शोभायात्रेचे आकर्षण होते.
चित्ररथातून संस्कृतीचे दर्शन
भारतीय संस्कृतीवर आधारित चित्ररथची शोभायात्रा शनिवारी सायंकाळी पाच वाजता मोठ्या पुलाजवळील नारायण बुवा समाधी मंदिरापासून काढण्यात आली होती़ तर आग्रारोडवरील श्रीराम मंदिराजवळ तिचा समारोप झाला होता़ या शोभायात्रेत युवक, युवती, पुरूषासंह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता़ शोभायात्रेच्या मार्गावर पाण्याची व्यवस्था तसेच विषयांवर सजीव देखावे करण्यात आले होते़
समितीतर्फे जुन्या आग्रारोडवरील नेहरू नगर चौकात गुढी उभारण्यात आली.
वाद्याच्या निनादात धरला ठेका
दरम्यान, सकाळी शहरातील चौकाचौकात गुढी उभारून मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
महिलांची प्रबोधन रॅली
शहरातील आदिशक्ती कानुश्री महिला मंच, प्रगती महिला मंडळ व वाणी समाजातर्फे गुढी पाडव्यानिमित्त आग्रारोडवरील श्रीराम मंदिरापासुन ते खोल गल्लीतील श्रीराम मंदिरापर्यंत महिलांची रॅली काढण्यात आली होती़ त्यांनी स्त्री भ्रुण हत्या थांबवा, बेटी वाचवा, बेटी शिकवा, झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत जनजागृती केली़ रॅलीत किरण येवले, शोभा येवले, कल्पना चाणसरकर, सुनंदा शिनकर, सिमा कोठावदे यांच्या ६० महिला पदाधिकारी सहभागी झाले होत्या.
सोनखरेदी तेजीत
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला गृह खरेदी, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी नागरिकांकडून करण्यात येत असते़ बाजारात कितीही तेजी असली तरी त्याला प्रतिसाद लाभत असतो़
यंदाच्या वर्षीही गृहखरेदीसह सोने, दुचाकी व चारचाकी वाहने आणि विविध गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीवर भर दिला जात आहे़