चाळीसगाव : हिंदू संस्कृतीमध्ये विवाह सोहळा म्हणजे सोळा संस्कारांपैकी एक सोहळा. बहुतेक जण आपले लग्न नाचणे, कुदणे अन् फटाक्यांची आतषबाजी अशा प्रकारे धुमधडाक्यात करित असतो. मात्र, चाळीसगावातील एका उच्च शिक्षित तरूणााने या पारंपारिक पद्धतीने धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न सोहळ्याला फाटा देत, भक्तीगित अन् पाडुंरंगाचे भजनाचा कार्यक्रम ठेवून आपले लग्न लावले. विशेष म्हणजे या नवरदेवाने स्वत: पाडुरंगावरील भजन म्हणुन संसार करण्यासोबत परमार्थही करण्याचा संदेश पाहुण्या मंडळींना दिला. या अनोख्या लग्न विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील पवार वाडीतील रहिवासी चेतन मोहन पवार यांचा तरूणाचा विवाह शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी अकोला येथील तरूणीशी चाळीसगावात पार पडला. चेतन पवार हे उच्चशिक्षित असून, एका बॅंकेत नोकरीला आहेत. विशेष म्हणजे चेतन यांना लहानपणापासून भक्तीमार्गाची आवड असून, गावात आणि परिसरात होणाऱ्या कीर्तन सोहळ्यात ते मृदुंग वादन करत असतात. भक्तीमार्गाची आवड असल्याने चेतन यांनी आपल्या लग्नात डी. जे. लावला नाही, तसेच कुठला बॅन्डही लावला नाही. सकाळपासून लग्नाच्या ठिकाणी त्यांनी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यानांही हा प्रकार पाहुन आश्चर्य वाटले.
नवरदेवाने स्वत : मृदुंग वाजवून म्हटली, पाडुरंग आणि संत मुक्ताईबाईची भजने :
चेतन पवार यांनी आपल्या लग्नात मित्र-परिवाराच्या आग्रहास्तव लग्नात ढोल-ताशाही लावला होता. मात्र, यावेळी त्यांनी स्वत: लग्न मंडपांत मृदुंग वाजवून `पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पाडुरंग विठ्ठला अशा प्रकारचे पाडुरंग आणि संत मुक्ताईबाईवरील भजने म्हटली. यामुळे लग्न मंडपात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. लग्न सोहळ्यात जणू कीर्तन सोहळ्याचा अनुभव पाहुणे मंडळींनी घेतला. विशेष म्हणजे नवरदेवाचे विविध गावातील कीर्तनकार व भजनी मंडळींनीदेेखील विविध संतानी लिहलेले अभंग सादर केले.
महाराष्ट्राला संताची आणि वारकरी परंपरेची परंपरा लाभली आहे. त्यामुळे लहान पासून भक्तीभावाचे संस्कार आई-वडिलांकडुन मिळाल्याने स्वत :चे लग्न पाडुंरंग-विठ्ठलाच्या नामस्मरणात झाले पाहिजे अशी ईच्छा होती. यातुन संसारासोबत प्रत्येकाने परमार्थ करावा, हे आवाहन करण्यात आले.-चेतन पवार, नवरदेव, चाळीसगाव.