महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:15 PM2018-12-07T12:15:00+5:302018-12-07T12:15:27+5:30

मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : पाणी, रस्ते, वाहतूक व्यवस्था, दळणवळणाव्दारे विकासाची भूक भागविण्याचे आश्वासन

The percentage will not continue in the corporation | महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही

महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेवर १५ वर्षांपासून राज्य करत असलेल्यांना विकासाशी घेणेदेणे नाही़ त्यामुळे आतापर्यंत विकासासाठी प्रयत्नच झाले नाही़ केवळ टक्केवारीसाठी मनपात अनेक लोक नागासारखे बसत होते़ परंतु भाजपची सत्ता आल्यास महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला़ शहराच्या विकासाची भूक भागविणार असल्याचेही ते म्हणाले़
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरूवारी सायंकाळी झाली़ यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, जळगावचे खासदार ए़टी़ पाटील, आमदार सुरेश भोळे, अमळनेरचे आमदार शिरीश चौधरी, आमदार स्मिता वाघ यांच्यासह रवी बेलपाठक, मदनलाल मिश्रा, लखन भतवाल, विनोद मोराणकर, प्रवक्ते संजय शर्मा, हिरामण गवळी यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते़ 
सभेत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शहराच्या विकासासाठी मनपाने कधीच प्रयत्न झाले नाही़ ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता़ ज्यांना विकासाचे व्हिजन आहे, ज्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चांगला आहे, त्यांच्याकडे महापालिका सोपविणे गरजेचे आहे़ धुळयाचे डॉ़ भामरे, रावल यांच्यासोबत गिरीश महाजनांना पाठवले़ ही त्रिमुर्ती धुळयाची दशा व दिशा बदलण्याचे काम करेल़  आमचा एकही नगरसेवक टक्केवारीची कामे करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले़ राज्यात ५० टक्क्यांपर्यंत नागरीकरण झाले, मात्र नियोजन नसल्याने शहरे बकाल झाली़
आमचे सरकार आल्यावर आम्ही नागरीकरणाला संधी मानले व मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला़ पिण्याच्या पाण्याची सुविधा, भुयारी गटार योजना मार्गी लावल्या़ पण धुळयाला निधी देतांना त्याचा दुरूपयोग तर होणार नाही ना? अशी भीती कायम वाटत होती़ मनपात जर भाजपची सत्ता आली तर ही भीती राहणार नाही व विकासाने शहराचा कायापालट होईल़ 
शहर हद्दवाढीतील गावांसाठी पाठविण्यात आलेल्या आराखड्याला आम्ही मंजूरी देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले़ धुळे महापालिका काहीच सोयी सुविधा पुरवित नसतांना येथे नाशिक पेक्षा अधिक कर आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर करांमध्ये तर्कसंगतता आणली जाईल़  अभय योजनेव्दारे शास्तीचा बोजा कमी करू असे मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले़ 
कोल्हेकुईकडे दुर्लक्ष करा-डॉ़ भामरे
धुळयात तीन आठवड्यांपासून काही लोक कोल्हेकुई करीत आहेत़ पण त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, अक्कलपाडा योजना, हद्दवाढीतील गावांसाठी ३५० कोटींचा निधी, सुलवाडे-जामफळ कनोली योजना, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर या प्रकल्पांमुळे धुळयाचा सर्वांगिण विकास होणार असून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे डॉ़ भामरे म्हणाले़ 
रडीचा डाव चालणार नाही-गिरीश महाजन
राज्यात विकास खुंटलेले शहर म्हणजे धुळे आहे़ केवळ भ्रष्टाचार व भानगडींमध्येच हे शहर अडकले आहे़ त्यामुळे आता विकासाचे परिवर्तन घडवायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले़ आधी हरायचं मग मतदान यंत्रांच्या नावाने ओरडायचे हे विरोधकांचे सुत्र झाले आहे़ लोक तुम्हाला स्विकारत नाही म्हणून मतदान यंत्रांच्या नावाने ओरड केली जाते़ पण आता ‘रडीचा डाव’ चालणार नाही़ आम्ही गुंडांना पक्षात घेतले असा आरोप करणाºयांनी आधी आरशात बघावे, असेही महाजन म्हणाले़
चांगल्या लोकांची बदनामी- जयकुमार रावल
शहर विकासात मागे आहे, पण येथे चांगले काम करणाºयांना अश्लील पत्रके काढून बदनाम केले जाते़ पण भाजपची सत्ता आल्यानंतर हे खपवून घेतले जाणार नसून शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असेही रावल यांनी स्पष्ट केले़ नाशिक व जळगावच्या तुलनेत मागे असलेल्या या शहराला आता परिवर्तनाची संधी असल्याचे ते म्हणाले़ 
कालिका मातेचे घेतले दर्शऩ़़
आमदार अनिल गोटे यांनी कालिका माता मंदिर व पंचमुखी हनुमान मंदिर हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थळी आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम कालिका माता मंदिर व पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले़ शिवाय सभेतही त्यांनी देवांचे दर्शन घेतल्याचे सांगितले़ मतदारच आमच्यासाठी देव असल्याचे ते म्हणाले़ 

Web Title: The percentage will not continue in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे