गौणखनिजचा ट्रक पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:41 PM2019-03-22T21:41:59+5:302019-03-22T21:42:29+5:30
आझादनगर पोलीस : ४ ब्रास वाळू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अनधिकृत गौणखनिजची वाहतूक केल्याप्रकरणी आझादनगर पोलिसांच्या पथकाने पारोळा चौफुलीवर ट्रकवर कारवाई करत ४ ब्रास वाळू आणि ट्रक जप्त केला़ ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली़ रात्री ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पारोळा चौफुलीवरील रस्त्यावर गौणखनिजची चोरट्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आझादनगर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी पारोळा चौफुलीवर सापळा लावला़ साडेबारा वाजेच्या सुमारास एमएच ०४ एफपी ११६५ क्रमांकाचा ट्रक येताच तो अडविण्यात आला़ ट्रकची मागील बाजू ताडपत्रीने झाकलेली होती़ ती उघडून तपासणी केली असता ८ हजार रुपये किंमतीची ४ ब्रास गौणखनिज आढळून आली़ गौणखनिजसह पोलिसांनी १ लाख २५ हजाराचा ट्रक असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे़
याप्रकरणी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ट्रकचालक गोरख राजू पवार (२८, रा़ कानडगाव ता़ चांदवड जि़ नाशिक) या संशयिताविरुध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील घटनेचा तपास करीत आहेत़