चारा छावण्या, पाण्याचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:25 PM2019-03-24T12:25:25+5:302019-03-24T12:26:05+5:30
बळसाणे : माळमाथा परिसरात दुष्काळाच्या झळा, बुराई नदीत पाणी सोडण्याची मागणी
बळसाणे : बुराई नदी कोरडी झाली असून नदीकाठावरील माळमाथा परिसरातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. साक्री तालुक्यासह माळमाथा परिसर हा कायम दुष्काळी भाग म्हणून गणला जातो दर पाच ते सहा वर्षांनी माळमाथ्यासह बळसाणे करांना दुष्काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही वर्षातील दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र आहे. यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. बुराई प्रकल्पातून तातडीने नदीत पाणी सोडल्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सद्यस्थितीत विश्वकल्याणक येथून पाण्याचे टँकर येत आहे. परंतू पाणी पुरत नसल्याने ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. गावात खासगी मालकीचे बोअर असून तेही नियमितपणे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत होते. परंतू कुपनलिकेतूनही पाणी येत नसल्याचे चित्र आहे. आहे त्या कुपनलिका आटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुपनलिका असलेल्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून बळसाणे ग्रामस्थांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. परिसरात पाणी, गुरांसाठी लागणारा चारा नसल्याने ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक सारेच हैराण झाले आहे. नळाला पाणी येत नसल्याने कामधंदा सोडून दिवसभर घरातील सदस्यांसह पिण्याच्या पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे.
माळमाथा भागातील गावांमध्ये भीषण दुष्काळाचे सावट आहे. परिसरातील नदी, नाले, तलाव, कुपनलिकांमध्ये ठणठणाट असून पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. विश्लकल्याणकामार्फत तीन ते चार वेळा पाणी टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, गुरांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असून दिवसेंदिवस तापमानात अधिकाधिक वाढ होत आहे.
बळसाणे ग्रामपंचायतीकडून नुकतेच जिल्हा प्रशासनाला बुराई नदीत पाणी सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी सांगितले. तर शासनाने मागेल त्या गावाला चारा छावणी देणार असल्याचे जानेवारी महिन्यात घोषित करूनसुद्धा चारा छावण्या उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरांसाठी लागणाऱ्या कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. सुमारे साडेतीन ते चार हजार प्रती शेकडा कडब्याचे दर आहेत. त्यात दुष्काळामुळे शेतकरी व मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे अगोदरच आर्थिक टंचाई जाणवत आहे.
संबंधित विभागाने लवकरात लवकर बळसाणेसह माळमाथा भागात चारा छावण्यांना परवानगी देऊन व वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा व बुराई नदीत पाणी सोडण्याचा प्रस्ताव मंजुर करावेत, अशी मागणी बळसाणेसह माळमाथा परिसरातील नागरिकांनी केली आहे.