धुळ्यात जागतिक हिवताप दिनानिमित्ताने कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:44 PM2018-04-25T21:44:26+5:302018-04-25T21:44:26+5:30
रॅलीद्वारे नागरिकांचे प्रबोधन; बसस्थानकातही प्रदर्शनाचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या काही वर्षात हिवतापामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनातर्फे हिवताप टाळण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, जिल्ह्यात हिवताप समूळ नष्ट कसा होईल? यादृष्टीने अधिकारी, कर्मचा-यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच नागरिकांनीही सजग राहून हिवतापाची लक्षणे दिसल्यास औषधोपचार घेतले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती व शिक्षण सभापती नूतन पाटील यांनी येथे व्यक्त केले.
जागतिक हिवताप दिवसानिमित्ताने जुन्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण, डॉ. संजय शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रदीप वैष्णव, मनपाच्या जीवशास्त्रज्ञ अपर्णा पाटील, प्रभारी वैद्यकीय अधिकारी एम. आर. झुंजारराव, तालुका आरोग्य पर्यवेक्षक एस.पी.गोसावी आदी उपस्थित होते.
रॅलीद्वारे जनजागृती
जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने बुधवारी मनपा व जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. जुन्या जिल्हा रुग्णालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत सरोजनी कॉलेज आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ‘गप्पी मासे पाळा हिवताप टाळा’, ‘तयारी हिवताप हरविण्याची’, ‘आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा पाळा’ यांसारख्या घोषणा देत नागरिकांची जनजागृती केली. रॅलीचा समारोप झाल्यानंतर जुन्या जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चार महिन्यात ४ हिवतापाचे रुग्ण
जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्याच्या कालावधित हिवतापाचे चार रुग्ण आढळून आल्याची माहिती जुन्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात देण्यात आली. जिल्ह्यात २०१५ मध्ये २३२, २०१६ मध्ये १२७ तर २०१७ सालात ८० हिवतापाचे रुग्ण आढळून आले. हिवताप जिल्ह्यातून समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती सुरू असून हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी येथे केले.