धुळे जिल्ह्यात रावण दहन करण्याची परवानगी देवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:01 PM2019-10-02T12:01:28+5:302019-10-02T12:01:47+5:30
आदिवासी एकता परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : राजा रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येवू नये अशी मागणी आदिवासी एका परिषदेच्या शिंदखेडा शाखेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूत रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात आहे. अनेक राज्यांमध्ये रावणाची पूजा केली जाते. रावण हा महाज्ञानी व विद्वान असल्याने आदीवासी समाजात पुजनीय आहे. आदिवासींच्या भावान दुखावल्या जाऊ नयेत, समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी रावण दहन प्रथा बंद करावी.
निवेदनावर प्रेमचंद सोनवणे, गुलाब सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, नाना महाले, राजन वाघ, गणेश मोरे, दीपक सोनवणे,भैय्या मोरे, दीपक देसाई, पिंटू पवार, रामदास सोनवणे, आबा अहिरे, गंगाराम बागूल, भाऊसाहेब भिल, गोकूळ गायकवाड यांच्यासह अनेकाच्या स्वाक्षऱ्या आहेत.