धुळे येथील वाग्देवता मंदिरास संभाजी भिडे गुरूजी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:49 PM2018-05-28T13:49:47+5:302018-05-28T13:49:47+5:30
आज संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन
धुळे - शहरातील सैनिक लॉन्स येथे सोमवारी संध्याकाळी आयोजित जाहीर सभेसाठी येथे आलेल्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी सकाळी शहरातील श्री वाग्देवता मंदिरास भेट दिली. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन सैनिक लॉन्स येथे करण्यात आले आहे.
वाग्देवता मंदिरास भेट, ग्रंथसंपदेची पाहणी
शहरातील मालेगाव रोडवर श्री वाग्देवता मंदिर असून तेथे सकाळी साडेदहा वाजता संभाजी भिडे यांचे आगमन झाले. त्यांनी तेथील समर्थ रामदास यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष समर्थभक्त शरद कुबेर, सत्कायोत्तेजक सभेचे चिटणीस प्रा.विश्वास नकाणेकर, कोषाध्यक्ष शंकरलाल जोशी, व्यवस्थापक मीना भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी संभाजी भिडे गुरूजी यांनी वाग्देवता मंदिरातील ग्रंथसंपदेची माहिती घेतली तसेच त्याची प्रत्यक्ष पाहणीही केली. अध्यक्ष कुबेर यांनी त्यांना समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली वाल्मिकी रामायणाची प्रत दाखविली. तसेच शंकरलाल यांनी लिहिलेली दासबोध ग्रंथाची प्रत दाखविली. यानंतर भिडे गुरूजी यांनी सत्कार्योत्तेजक सभेत जाऊन तेथेही माहिती घेतली. सभेने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या सर्व प्रकाशने त्यांना दाखविण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत भिडे गुरूजी वाग्देवता मंदीर व सत्कार्योत्तेजक सभा येथे होते. यावेळी वाग्देवता मंदिराचे कर्मचारी गौरव वाणी, रघुनाथ माळी, भरत कचवे, मनिष बिडकर आदी उपस्थित होते.