म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी १०० खाटांचा स्वतंत्र कक्ष, उत्तर महाराष्ट्रातील पहिले उपचार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:07+5:302021-05-24T04:35:07+5:30
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसवर उपचार करणारे धुळ्याचे जवाहर मेडिकल हे पहिले हॉस्पिटल ठरले असून यामुळे रुग्णांना चांगलाच आधार ...
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसवर उपचार करणारे धुळ्याचे जवाहर मेडिकल हे पहिले हॉस्पिटल ठरले असून यामुळे रुग्णांना चांगलाच आधार मिळाला आहे.
कोरोना आजारावर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजाराची लागण होत आहे. धुळे जिल्ह्यातही रुग्ण आढळत आहेत. नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा नाक, टाळू येथे आढळणे, डोळा दुखणे, सुजणे, दृष्टी कमकुवत होणे अशी लक्षणे आढळून येतात. तत्काळ उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो, अन्यथा डोळा गमवावा लागतो. तर काहींचा मृत्यूही ओढवला जातो. अशा रुग्णांना धुळ्यातच उपचार मिळावेत आणि त्यांना आधार मिळावा म्हणून जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार कुणाल पाटील यांच्या पुढाकारातून डॉ. ममता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर मेडिकल फाउंडेशन आणि डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १०० खाटांचा अद्ययावत वाॅर्ड सुरू करण्यात आला.
आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवारी या उपचार केंद्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळात शेकडो रुग्णांना जीवनदान देण्यात जवाहर मेडिकल यशस्वी ठरले आहे. उद्घाटनांतर त्यांनी रुग्णांची विचारपूस केल्याने दिलासा मिळाला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अरुण डोडामणी, डॉ. बी.एम. रुडगी, डॉ. मनोज कोल्हे, डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. के. गिंदोडिया, डॉ. गोयल, डॉ. रेशमा होलीकट्टी, डॉ. चिदंबर यांच्यासह जवाहर मेडिकल व डेंटल कॉलेजचे तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.
उपचारासोबत समुपदेशनही
कोेरोना आणि म्युकरमायकोसिस या आजारामुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातो. अशा रुग्णांना मानसिक आधार देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावेत म्हणून जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये रुग्णांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराबरोबर मानसिक समुपदेशनही येथे होणार आहे.