शिरपूरला केमिकल फॅक्टरीतील स्फोटात १३ ठार; ५२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:58 PM2019-08-31T13:58:13+5:302019-08-31T14:18:08+5:30
पालकमंत्री, अधिकारी पोहचले : वाघाडी-बाळदे रस्त्यावरील सकाळची घटना
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात १२ जण ठार तर ५८ जण जखमी झाले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. ही घटना वाघाडी-बाळदे रस्त्यावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक एम.एन. रत्नपारखी घटनास्थळी पोहचले. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
शिरपूर येथे असलेल्या एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत १२ जण ठार झाले असून जखमींची संख्याही वाढून ५२ पर्यंत पोहचली आहे.
मृतांपैकी पीनाबाई जितेंद्र पावारा (३५, रा. चांदसूर्या), रोशनी पावरा (१४ रा. चांदसूर्या), सुबीबाई रमेश पावरा (२५ रा. चांदसूर्या ), पंजाबाई विशाल पावरा (२५, रा. वकवाड ), रमेश सजन कोळी(३५,रा. वाघाडी) यांची ओळख पडली असून, दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.
दरम्यान ही कंपनी मुंबईच्या उमीत ग्रुपने चालवायला घेतली होती. या कंपनीत औषधांना लागणारे केमिकल तयार होत होते. कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टमध्ये ४० ते ५० कामगार काम करतात. शिफ्ट बदलण्याच्यावेळेसच ही दुर्घटना घडली. या स्फोटांचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.