शिरपूर येथे गावठी पिस्तुलासह तीन लुटारु ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 10:13 PM2017-12-03T22:13:41+5:302017-12-03T22:14:35+5:30
शिरपूरातील घटना : एकास नागरिकांनी तर दोघांना नाकाबंदीत पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील स्टेट बँक शाखेच्या एटीएम कक्षात ग्राहक मशिन आॅपरेट करीत असतांना पैसे न निघाल्यामुळे कॅन्सल बटन दाबण्याच्या आधीच त्या ग्राहकाच्या खात्यातून २० हजार रूपये काढून लुटल्याची घटना घडली़ लुटणाºया एकास पाठलाग करून तर अन्य दोन जणांना नाकाबंदी करून पकडण्यात आले़ या तिघांच्या टोळीकडून गावठी पिस्तूलसह रोख रक्कम व वाहन असा एकूण ६ लाख ४१ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ उत्तर प्रदेशातील या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
शनिवारी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास येथील पीओपी वितरक वसिम रियाज पठाण, रा़स्टेट बँक कॉलनी करवंद नाका शिरपूर हे त्यांचे मित्र प्रफुल्ल राजपूत, मिलींद राजपूत यांच्यासोबत शहरातील स्टेट बँक शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले़ त्यावेळी त्यांचे अन्य दोन मित्र एटीएम कक्षाच्या बाहेर उभे होते़ यापूर्वीच एटीएम कक्षात तीन अनोळखी व्यक्ती पैसे काढण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने पैसे निघत नसल्याचे सांगून पठाण यांचे एटीएम कार्ड टाकून पाहिले़ काही वेळानंतर पुन्हा पठाण यांनी एटीएम कार्ड टाकले असता त्यापैकी एकाने लागलीच पठाण यांचे कार्ड काढून त्यांचे कार्ड टाकले़ मात्र त्यापूर्वीच पठाण यांनी पीन कोड टाकल्यामुळे त्यांचे २० हजार रूपये त्यांनी काढून घेतले़ पठाण यांना संशय आला़ ते पैसे घेवून अनोळखी तिघे इसम बाहेर पडत असतांना पठाण यांनी त्यांचा मागे जावून एकाचा हात पकडून एटीएम कक्षाकडे नेत असतांना त्याने हात झटकून पळ काढला़
महाराजा कॉम्प्लेक्स समोरील स्टेट बँकेजवळ उभी असलेली एम़एच़०३-९९८० या क्रमांकाच्या कारकडे धावत असतांना एकाला पकडण्यात आले़ त्याचवेळी पोलिस गस्त घालत तेथे आले. तेव्हा त्या चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ परंतु तत्पूर्वीच तेथून कार घेऊन दोघे तेथून एसटी़स्टॅण्डच्या दिशेने पसार झाले़ घटनेचे वृत्त पोलिस निरीक्षक संजय सानप यांना कळताच यांनी लागलीच नाकाबंदी करण्याचे आदेश वायरलेसद्वारे दिले़ काही वेळानंतर पसार झालेली कार सांगवी पोलिसांना हाडाखेडगावाजवळ नाकाबंदीद्वारे पकडण्यात यश मिळाले. ही पाच जणांची टोळी उत्तर प्रदेशातील असून यावेळी मात्र दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून पिस्तूल, रोख रक्कम, मोबाईल व कार आदी मिळून ६ लाख ४१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
याप्रकरणातील संशयित लुटारू ओमप्रकाश मनिराम जयस्वाल (२१) राक़ोठार मंगलेपूर पोस्ट सागरा सुंदरपुरा ता़लालगंज जिल्हा प्रतापगड (उत्तरप्रदेश) यास बँकेजवळच लोकांनी पकडून दिले होते़ तर सैय्यद खान कमालउद्दीन खान (२७) रा़तिलावरी पोस्ट सगरा सुंदरपूर लालगंज व तौफीक खान सनाप मुस्तकीम खान (२७) रा़सगरा सुंदरपूर लालगंज असे दोघांना नाकाबंदी करून जेरबंद करण्यात आले आहे़ या घटनेतील दोन जण फरार आहेत़ पुढील तपास सुरु आहे़