थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे २ महिन्यापूर्वी घराचा पाया खोदत असताना मजुराला सोन्याची कळशी सापडली होती. थाळनेर पोलिसांनी या मजुराकडून २ लाख रुपये किंमतीची सोन्याची नाणे व चांदीचे कडे हस्तगत केले आहे. सदर नाणी इंग्रज काळातील २०० ते ३०० वर्षापूर्वीची असण्याची शक्यता आहे.थाळनेर येथील बाजारपेठेत राहणाऱ्या आधार बुधा मराठे यांना शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला होता. त्यांनी स्वमालकीच्या जागेवर घराचे बांधकाम सुरु केले होते. त्यांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे घरच्या घरीच त्यांनी काम सुरु केले होते. त्यांनी ६ पायांपैकी २ स्वत: खोदले व ४ पायांचे खोदकाम मजुर राकेश सुभाष सावळे व दिलीप दशरथ भोई यांना दिले होते. या पायापैकी उत्तर बाजूचा २ नंबरचा पाया खोदत असताना ४ फुटावर मजुरांना सोन्याने भरलेली कळशी दिसली होती. त्यांनी ते काम अपूर्ण सोडून दुसऱ्या दिवशी राकेश सावळे ती कळशी घेऊन पसार झाला होता. याबाबत विचारल्यावर राकेश सावळे दादागिरीची भाषा करत असल्यामुळे घर मालकाने २१ मार्च रोजी थाळनेर पोलिसात तक्रार केली होती. थाळनेर पोलिसांनी २२ रोजी राकेश सावळे व दिलीप भोई यांची चौकशी केली असता, राकेश सावळे याने तांब्याची पुरातन १ ते १.५० किलो वजनाची कळशी व लहान ग्लास पोलिसांना काढून दिला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता. १७ सोन्याची नाणी ५९.६ ग्राम वजनाची व चांदीचे कडे ५०२ ग्राम वजनाचे ४ चांदीचे कडे घरातून काढून दिले. त्याची किंमत सुमारे २ लाख आहे.सोन्याची नाणी पुरातन काळातील दिसून येतात. त्यांच्यावर इंग्रजी अक्षरे दिसून येतात तसेच एका बाजूस एक बौद्ध भिक्कू आशीर्वाद देताना उभा असून एक राजा त्यांच्या समोर नतमस्तक झालेला दिसून येतो. तर दुसºया बाजूस बौद्ध भिक्कूची प्रतिमा दिसून येते. त्याठिकाणी इंग्रजीमध्ये अक्षरे कोरलेली आहे. सदर नाणी २०० ते ३०० वर्षापूर्वीची इंग्रजाच्या काळातील असल्याची शक्यता आहे. कळशी व ग्लास पितळाच्या धातूचे दिसून येत आहेत. चांदीचे कडे नव्याने घडवलेले दिसून येतात. सदर कडे सोन्याची नाणी मोडून केले असल्याचे नाकारता येत नाही. कळशी सोन्याची भरलेली असल्याची चर्चा गावात सुरु आहे. सोन्याची नाणी मोडून चांदीचे कडे राकेश सावळे याने कुठे घडवले, याबाबतच्या तपासाचे आव्हान येथील पोलिसांपुढे आहे. त्यामुळे पोलीस पूर्ण मुद्देमाल कसा हस्तगत करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
दोन लाखांची सोन्याची नाणी, चांदीचे कडे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:27 PM