दोन न्यायाधिशांच्या घरांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:17 PM2019-03-11T23:17:41+5:302019-03-11T23:18:12+5:30
दोंडाईचा : सराईत गुन्हेगाराचे कृत्य
दोंडाईचा : शहरातील एका सराईत गुन्हेगाराने दोन न्यायाधिशांच्या घरांवर दगडफेक करून गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. लोकांनी या गुन्हेगारास पकडून त्यास चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यास येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्की निकवाडे असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
निकवाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. सोमवारी ९ वाजेच्या सुमारास तो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असलेल्या परिसरात पोहचला. तेथे न्या.अण्णासाहेब गिºहे राहतात. निकवाडे याने त्यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. तसेच त्यांची गाडी असल्याचे समजून तेथे उभी असलेली दुसरीच गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निकवाडे नूतन महाविद्यालयाच्या जनता कॉलनी परिसरात पोहचला. तेथे न्या.संतोष गरड राहतात. निकवाडे याने त्यांच्या घरावरही तुफान दगडफेक केली. या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
या वेळी त्याच्यासोबत असलेले अन्य दोघे जण पळून गेले. त्यांचे नाव कळू शकलेले नाही. नागरिकांनी हा प्रकार पाहताच त्यांनी निकवाडे यास पकडून चांगलाच ‘पब्लिक मार’ दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलीस तत्परतेने घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी पकडून ठेवलेल्या निकवाडे यास पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांच्या मारामुळे जखमी झालेल्या निकवाडे यास पोलिसांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अद्याप पोलिसांत काहीही नोंद करण्यात आलेली नाही. निकवाडे याने हे कृत्य का केले, याचे कारण कळू शकलेले नाही. मात्र झाल्या प्रकाराने नागरिक भयभीत झाले असून त्याचीच चर्चा सुरू आहे.