शिरपूर : विसाव्या पशुगणनेचे काम अगोदरच दोन वर्षे विलंबाने हाती घेण्यात आले होते़ प्रगणकांनी विविध अडचणींवर मात करून गणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर आता जिल्हा व तालुकानिहाय नेमकी किती जनावरे आहेत, याबाबत केलेली पशुगणना जाहीर होण्याची प्रतिक्षा लागली आहे़ परंतु संबंधित विभागाला पशुगणना जाहीर करण्यास मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न पशुपालकांकडून उपस्थित होत आहे़केंद्रीय कृषी व पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयामार्फत जनावरांमध्ये गाय, म्हैस, मेंढी, शेळी, वराळ, शिंगरू, घोडा, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती तर कुकुटवर्गीय पशंूमध्ये कोंबडा-कोंबडी, इमू, पदक आदींची गणना करण्यात येते़ लुप्त होणाऱ्या प्रजाती तसेच पशुगणनेच्या आधारे पशुसंवर्धन व संशोधन करणे शक्य असते़ त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते़ त्यानुसार १९ वी पशुगणना २०१२ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २०वी पशुगणना पाच वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये होणे अपेक्षित होते़ मात्र, विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २०वी पशुगणना सात वर्षांनी म्हणजेच जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली़ त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले़ या माध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्यासाठी लाईव्ह स्टॉक सेन्सेस या संकेतस्थळावर दिल्लीतील मुख्य सर्व्हरवर प्रगणकांमार्फत माहिती नोंदविली जात होती़ परंतु सर्व्हर डाऊन राहणे, ग्रामीण भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशुगणना पूर्ण होण्यास नोव्हेंबर महिना उलटला़३५ प्रगणकांकडून पशुगणनाशिरपूर तालुक्यात ३५ प्रगणकांकडून ही पशुगणना नुकतीच पूर्ण झाली़ तालुक्यातील २०व्या पशुगणनेला मुहूर्त लागला़ जानेवारी २०१९ मध्ये प्रत्यक्ष पशुगणनेला सुरूवात झाली़ या पशुगणनेसाठी ३५ प्रगणक, पाच पर्यवेक्षक व एक सांख्यिकी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती़ ही पशुगणना आॅनलाईन करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले होते़भविष्यात शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत होते़ परंतू २०१९ हे वर्ष संपत आले तरी पशुगणनेचे आकडे जाहीर होत नसल्याचे समोर आले आहे़ पशुगणना जाहीर होत नसल्याने भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो कि नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़ सर्व प्रक्रिया झाल्यानंतरही गणना जाहीर होत नसल्याने घोडे नेमके अडले कुठे, असा प्रश्न पशुपालक शेतकरी करीत आहेत़
पशुगणना जाहीर करण्यास मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:52 PM