विनापरवाना बियाण्यांची विक्री एकाला भोवली, गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:35 AM2021-05-24T04:35:05+5:302021-05-24T04:35:05+5:30
शिंदखेडा तालुक्यातील वरूळ (घुसरे) गावात प्रकाश पीतांबर पाटील (४६) हे आपल्या घरात विनापरवाना अनधिकृत असलेले एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या ...
शिंदखेडा तालुक्यातील वरूळ (घुसरे) गावात प्रकाश पीतांबर पाटील (४६) हे आपल्या घरात विनापरवाना अनधिकृत असलेले एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या पध्दतीने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अभय कोर यांना मिळाली़ माहिती मिळताच त्याची खातरजमा करीत छापा टाकण्याचे नियोजन केले़ तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे यांना या प्रकाराची पूर्वकल्पना देण्यात आली़ शिंदखेडा पोलिसांची मदत घेऊन मोहीम अधिकारी अभय कोर, साक्री पंचायत समितीचे कृषी रमेश नेतनराव यांच्या पथकाने शिंदखेडा तालुक्यातील वरूळ (घुसरे) गावातील प्रकाश पितांबर पाटील यांच्या माळीवाड्यातील घरात रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकला़ घराची पथकाने झाडाझडती घेतली असता घराच्या पहिल्याच खोलीत पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये बोगस, संशयित, अनधिकृत एचटीबीटी संकरित कापूस बियाणे ४५० ग्रॅम वजनाची २० पाकिटे आढळून आले आहेत़ बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यावर उत्पादकाचे नाव, चाचणी व अंतिम दिनांक नमूद नसल्याचे आढळून आले़ ही बोगस बियाणे प्रकाश पाटील यांनी कोठून खरेदी केली, त्याच्या खरेदीची पावती अथवा बिल दाखवू शकले नाही़ त्यामुळे १५ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे़ प्रकाश पाटील यांनी अनधिकृतपणे बियाण्यांची साठवणूक केल्याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़