अर्थे : शिरपूर तालुक्यातील अर्थे बु. गावाची लोकसंख्या साडेचार हजार आहे. गावाला गेल्या पंधरा वर्षांपासून थेट कुपनलिकांमधून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जल पातळी खालावली आहे. यामुळे पाच दिवसाआड जुन्या जीर्ण झालेल्या पाईप लाईनमधून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना रणरणत्या उन्हात पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे.अर्थे बु. गावात १९८५ मध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली व गावात पाईपलाईन टाकण्यात आली. या पाणीपुरवठा योजनेतून गावाला १० ते १५ वर्ष पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर गावात व परिसरात अनेक कुपनलिका करुनही पुरेसे पाणी न लागल्याने उपलब्ध असलेले पाणी थेट पाईपलाईनमधून नळांना सोडण्यात येत आहे. गावात गेल्या आठ वर्षांपूर्वी नवीन एक लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ जिल्हा परिषद शाळेजवळ बांधण्यात आला. तसेच गावात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. परंतू नागरिकांनी नवीन पाईप लाईनवर नळजोडणी न केल्यामुळे व काही तांत्रिक अडचणींमुळे या जलकुंभात पाणीच सोडले गेले नाही.परिणामी जुन्याच पाईप लाईनमधून थेट कुपनलिकांमधून पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात कुपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.गावातील नवीन वाढलेल्या वस्त्या व गावाचा भाग चढउताराचा असल्यामुळे चार कुपनलिकांचे पाणी असूनही पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. यासाठी नवीन पाण्याच्या टाकीत पाणी सोडून जुनी पाईपलाईन बंद करुन नवीन पाईप लाईनवर नळ जोडणी करणे आवश्यक आहे.जुनी धोकेदायक पाण्याची टाकी अर्धवट तोडलेली आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही जीर्ण टाकी पूर्ण तोडण्याची आवश्यकता आहे.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मुखेड सिंचन प्रकल्प किंवा तापी नदीवरुन पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पाच दिवसाआड मिळते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:12 PM