एक वर्षाच्या आत रोज एक तास पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:18 PM2018-12-07T12:18:18+5:302018-12-07T12:18:59+5:30
अनिल गोटे : जाहीर प्रचार सभेत दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीद्वारे हेमा गोटे महापौर झाल्यास एक वर्षाच्या आत शहरातील ६ लाख जनतेला रोज सकाळी एक तास पाणी देण्याचे वचनरूपी आश्वासन आमदार अनिल गोटे यांनी दिले. लोकसंग्राम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवतीर्थावर गुरूवारी रात्री झालेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. तसे न झाल्यास मी आमदारकीसाठी मते मागायला येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, दिलीप साळुंखे, योगेश मुकुंदे आदी उपस्थित होते. सरकारने शहरातील अतिक्रमितांची यादी मागविली होती. परंतु मनपातील सध्याच्या सत्ताधाºयांनी ती अद्याप दिली नाही. पण आाची सत्ता येताच पहिल्या १०० दिवसात शहरातील साडेअठरा हजार झोपडपट्टी वासीयांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा द्या, असा ठराव मनपात करून सरकारकडे नेण्याचे आश्वासनही आमदार गोटे यांनी दिले. ही संधी न साधता तुम्ही भाजपच्या गुंड उमेदवारांना निवडून दिल्यास तुमच्या माता-भगिनी, मुली सुरक्षितपणे शहरात फिरू शकणार नाही, असा गंभीर इशारा दिला. भाजपच्या तिन्ही मंत्र्यांसह पदाधिकाºयांवरही चौफेर टीका केली. डॉ.भामरे म्हणतात मी २५ हजार कोटी रुपये आणले. मग ते कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग होणार ही खोटी गोष्ट असून हे मी नीट अभ्यास करून बोलतो. रेल्वेने मला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अजून या मार्गाचा डीपीआरच झालेला नाही असेही ते म्हणाले़