धुळे जिल्ह्यात आदिशक्तीचे जल्लोषात झाले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 04:49 PM2018-10-10T16:49:58+5:302018-10-10T16:51:52+5:30
एकवीरादेवी मंदिरात महापौर कल्पना महाले यांच्याहस्ते महाआरती
आॅनलाइन लोकमत
धुळे- गणपती पाठोपाठ शहर व जिल्ह्यात आदिशक्ती देवीची मोठ्या उत्साहात व जल्लोषात बुधवारी स्वागत करण्यात आले. विविध मंडळांच्या ठिकाणी विधीवत पूजन करून देवीची स्थापना करण्यात येत होती. दरम्यान मूर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केल्याने, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तर घटस्थापनेच्या शुभमहूर्तावर अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहनांची खरेदी केल्याने, बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली.
एकवीरादेवी मंदिरात घटस्थापना
खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरातही बुधवारी सकाळी विधीवत घटस्थापना करण्यात आली. श्रीएकवीरा देवी व रेणूका माता मंदीर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याहस्ते पहाटे ५ वाजता सपत्नीक काकडारती व पुजाविधी झाला. दुपारी १२ वाजता महापौर कल्पना महाले, यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव उपस्थित होत्या. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. पहिल्या माळेलाच दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवात खान्देश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक गर्दी करतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना २४ तास आई भगवतीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस, होमगार्ड व सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
बाजारात उत्साह
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडसह पुढे दत्त मंदिर, साक्रीरोडवरील जिल्हा रुग्णालय जवळ, फुलवाला चौक आदी परिसरात घटनस्थापनेचे पुजा साहित्य व दुर्गामूर्ती खरेदीसाठी नागरिकांची व विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळली होती. संध्याकाळीही अनेक भक्तांनी दूर्गादेवी मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली़ आग्रारोडवर गरबा, रास दांडिया,यासाठीचे साहित्य, पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी वाजतगाजत देवीची मूर्ती मंडपात नेली होती.
जिल्ह्यात जवळपास २५० मंडळांतर्फे नवरात्रोत्सव साजरा केला होता. यातील बहुतांश मंडळांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
अनेकांनी साधला घटस्थापनेचा मर्हूत
दरम्यान यावर्षी कमी झालेला पाऊस व पितृपक्ष यामुळे गेले १५ दिवस बाजारपेठेत मंदी सदृश्य वातावरण होते. मात्र घटस्थापनेचा महूर्त साधून अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहनांची खरेदी केली. यामुळे लाखो रूपयांची उलाढाल झाली. या आर्थिक उलाढालीमुळे व्यापाºयांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झालेले होते.