लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली, नाशिक, जळगाव महापालिकेसाठी मोठ-मोठ्या पॅकेजची घोषणा केली ,मात्र दिले काहीच नाही. जे सरकार शिर्डी देवस्थानाकडून कर्ज घेते ते धुळे शहराच्या विकासासाठी काय पैसा देणार असा सवाल करीत, शिवसेनेला मनपाची सत्ता दिल्यास, शहराचा कायापालट करून दाखवू असे आश्वासन शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी आज े येथे दिले.महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ अमळनेर स्टॅँड परिसरात गुरूवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार किशोर पाटील, माजी आमदार कैलास पाटील, प्रा. शरद पाटील, संपर्क प्रमुख के.पी.नाईक, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, प्रियंका घाणेकर आदी होते.खासदार राऊत यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारकड ेपैसा नाही, मात्र ते कोट्यावधी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा करतात. या सर्व घोषणा फसव्या आहेत. २०१४ ची निवडणूक भाजपाने पैशांच्या भरवशावर जिंकली. मात्र आता जनतेचा भाजपावर विश्वास राहिलेला नाही. आगामी काळात मुख्यमंत्र्यांपासून ते महापौरापर्यंतची खुर्ची ही शिवसेनेचीच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास, भाजप शिल्लक राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी जळगावची धरणे बांधली नाही, ते धुळ्यात काय विकास करून दाखविणार? भाजपाने दिलेले एकही वचन पूर्ण केलेले नाही. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली मात्र ती हवेतच राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्ज घेणारे सरकार विकासासाठी काय पैसा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:19 PM