रात्रीची निरव शांतता, चांदण्याच्या लख्ख प्रकाशात स्वच्छ भासणारे जंगलातील पाणवठे, मनात धाकधूक निर्माण करणारी रातकिड्यांची कुजबुज अशा निसर्गरम्य शांत वातावरणात जंगलातील जैवविविधतेचे निरीक्षण करणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणीच असते. अभयारण्यातील वनक्षेत्रातील प्राण्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे दरवर्षी सर्वाधिक प्रकाश असलेल्या रात्री म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच विष्ठा आणि ठशांचा अभ्यास करून वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यामध्ये केवळ वाघ आणि बिबट्या नव्हे, तर सर्व प्रकारच्या वन्य प्राण्यांचा समावेश असतो. गणनेदरम्यान मिळालेल्या आकडेवारीची सरासरी काढून वनक्षेत्रातील प्राण्यांचे आकडे जाहीर होतात. या आधुनिक गणनेबरोबरच आजही वन अधिकाऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने बुद्ध पौर्णिमेला गणना केली जाते.
मात्र गेल्या वर्षापासून कोराेनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकेदायक असल्याने, यावर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात २० ठिकाणी होते गणना
धुळे तालुक्यात धाप धरण, गारबर्डी तलाव, हरण्यामाळ तलाव, तिन कोऱ्या, चिंचवन तलाव, एडक्या धरण, नंदाळे, विन्याडोह, गरताड रोप वाटीका, साक्री तालुक्यात नायनदी, अक्कलपाडा, घाणेगाव धरण, शिरपूर तालुक्यातील बोराडी कक्ष ७७३, मालकातर, विरखेल धरण, लाटीपाडा धरण, शेलबारी धरण, शिंदखेडा तालुक्यातील कर्ले, साळवे, खलाणे, शिंंदखेडा, चिमठाणा अशा विविध २० ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना केली जात असते.
जिल्ह्यातील वनक्षेत्रात नीलगाईच्या संख्येत वाढ
जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्राचा भूभाग मोठा असल्याने जळगाव व पारोळा वनविभागातून भ्रमंती करीत धुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या वनप्राण्यामध्ये बिबट्यांपाठोपाठ आता नील जातीच्या गायीची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. त्यामुळे वन विभागाकडून आता नीलगायीच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केेले जात आहे.
विष्ठा व पाऊल खुणांवरून परीक्षण
वन विभागाकडून साक्री, शिंदखेडा, शिरपूर तसेच धुळे तालुक्यातील वन भागात वास्तव्याला असलेल्या वन्य प्राण्याची नोंद केली जाते. काही वर्षापुर्वी १६ निलगाईची नोंद केली होती. मात्र धुळे तालुक्यात वनपरिक्षेत्रात नीलगाईच्या लेंड्या व पाऊलखुणांच्या आधारावर सुमारे १६० पेक्षा अधिक गाई वास्तव्याला असल्याचा दावा वनविभाागाकडून करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी ३१८ वन्यप्राण्यांची नोंद
गत वर्षी बुध्द पौणिमेला वनविभागाकडून वन्य पाण्याची गणना करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक बिबट्या आढळून आले होते. तर निलगाय १६ , चिंकारा १५ , मोर २०, ससा २०, सायाळ ८, पाण कोंबड्या १०, बगळे ३०, रानडुक्कर १५ असे एकूण धुळे तालुक्यात १३१ प्राणी आहेत़ लांडगे ३५, ससे १८, मोर ०५, घार ०४, पाणकोबड्या ८, बिबट्या ०२, तरस ३, रानडुक्कर १०, साक्री ८८ , कोल्हा ३ , लांडगे २, तितर ९, रानमांजर ३ , तरस ४ , बोराडी २१, बिबट्या ९ , चिकारा ११, अस्वल ४, रानडुक्कर ८ पिंपळनेर ३२ , बिबट्या २ , मोर २१, लांडगे ५ , कोल्हे ६, ससे २, हरीण ५, शिंदखेडा ४१ तर जिल्ह्यात वन्यप्राणी २०९ पक्षी १०९ असे एकूण ३१८ वन्यप्राणी नोंद करण्यात आली आहेत.