पहाटेपर्यंत सुरु होते न्यायालयीन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 10:47 PM2019-09-01T22:47:51+5:302019-09-01T22:48:18+5:30

जळगाव घरकूल : सर्व संशयित कारागृहात

The working of the court begins till dawn | पहाटेपर्यंत सुरु होते न्यायालयीन कामकाज

पहाटेपर्यंत सुरु होते न्यायालयीन कामकाज

Next

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी धुळ्यातील न्यायालयात शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरु झालेले न्यायालयीन कामकाज रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनीटांपर्यंत सुरु होते़ कामकाजानंतर सुरेशदादांसह सर्व संशयित आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली़ 
जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज येथील विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्या न्यायालयात सुरु होते़ बचाव पक्ष आणि सरकारी पक्षांच्या वकीलांची भूमिका जाणून घेतल्यानंतर निकालाची उत्सुकता होती़ शनिवारी निकाल लागणार असल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्वच संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते़ त्यामुळे पुण्यातील दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पुष्पा पाटील यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने न्यायालय आवारात आणण्यात आले होते़ याशिवाय अन्य आरोपींना व्याधी असूनही ते देखील उपस्थित होते़ 
सकाळी ११ वाजेच्या सुमारास कामकाज असल्यामुळे सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व संशयित आरोपी टप्प्या-टप्प्याने येण्यास सुरुवात झाली़ ते येत असताना त्यांची हजेरी न्यायदान हॉलच्या बाहेर घेऊन त्यांना आणि त्यांच्या वकीलांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता़ बचाव पक्ष आणि सरकारी पक्षातील वकीलांची भूमिका ऐकल्यानंतर दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सर्वच संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले़ त्यानंतर लागलीच वातावरणात बदल जाणवायला लागला़ अगदी पाणी प्यायला कुठे जायचे असेलतरी त्यांच्या सोबत पोलीस देण्यात येत होता़ कामकाज सुरु असतानाच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांनी सर्व आरोपींना त्यांना लावण्यात आलेल्या कलमानुसार आणि त्यांनी केलेल्या कृत्याप्रमाणे शिक्षा ठोठावली़ 
जेवणाचे डबे मागविले
न्यायालयीन कामकाज सुरु असताना होणारा वेळ लक्षात घेऊन आणि वेगवेगळ्या व्याधीने त्रस्त असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जेवण मागवू शकतात असे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुपारी जेवणाची सोय टप्प्या-टप्प्याने करण्यात आली होती़ तशीच स्थिती रात्री देखील करण्यात आली़ 
औषधांची झाली तपासणी
जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज दिवसभर आणि रात्री       उशिरापर्यंत सुरु होते़ परिणामी संशयित आरोपींपैकी बहुतांश जणांना नियमित औषध घ्यावे लागत असल्यामुळे त्यांना औषध पाठविण्याची लगबग रात्री सुरु झाली़ ती त्यांच्या पर्यंत पोहचविण्यापुर्वी त्या औषधांची तपासणी स्थानिक पोलिसांकडून केली जात होती़ 
पहाटेपर्यंत कामकाज
दिवसभरात सुरु असलेले न्यायालयीन कामकाज संपेल असे वाटत असताना मात्र प्रत्यक्षात हे कामकाज रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनीटांपर्यंत सुरु होते़
कारागृहात रवानगी
न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सुरेशदादांसह सर्वच आरोपींना टप्प्या-टप्प्याने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेण्यात आले़ तपासणी केल्यानंतर त्यांना धुळ्यातील कारागृहात नेण्यात आले़ 
१०० कोटींचा दंड का आणि कशासाठी 

कलम १७७ : मुद्दाम खोटी माहिती देणे  (६ महिने साधी कैद, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ दिवस साधी कैद)
कलम २०१ : पुरावा नष्ट करणे  (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४०६ : अपहार  (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४०९ : लोकसवेकाने केलेला अपहार  (७ वर्ष साधी कैद, १०० कोटी रुपये दंड, दंड न भरल्यास ३ वर्ष साधी कैद)
कलम ४११ : चोरीची मिळकत विकत घेणे (३ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४६५ : बनावट दस्ताऐवज तयार करणे (२ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४६८ : फसवणुकीच्या हेतून खोटे दस्ताऐवज तयार करणे (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४७१ : फसवणुकीसाठी खोटे दस्ताऐवज तयार करणे (२ वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम ४२० : फसवणूक  (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम १३ (१) (ड) : लाचलुचपत प्रतिबंधक कायदा भ्रष्ट मार्गाने स्वत: किंवा अन्य व्यक्तीला फायद्याचा लाभ मिळवून देणे  (७  वर्ष साधी कैद, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद)
कलम १२० ब : कट रचणे (गुन्ह्यात हे कलम लावण्यात आले आहे, मात्र शिक्षेत ते घेण्यात आले नाही)

Web Title: The working of the court begins till dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.