व्वा डॉक्टर! चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:39 AM2021-05-25T04:39:46+5:302021-05-25T04:39:46+5:30
धुळ्यातील एका नवजात चिमुकल्यास निओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) ठेवण्यात आले होते. या कालावधीत त्या मुलांची खूप काळजी घ्यावी ...
धुळ्यातील एका नवजात चिमुकल्यास निओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) ठेवण्यात आले होते. या कालावधीत त्या मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. शुक्रवारी मध्यरात्री ते बाळ अचानक मोठमोठ्यानं रडू लागल्याने त्या बाळाला शांत करण्यासाठी व झोप यावी म्हणून तिथे म्हणून येथील डॉ. अभिनय दरवडे यांनी एक सुंदर गाणं गायलं. 'इस मोड से जाते है.. कुछ सुस्त क़दम रस्ते.. कुछ तेज कदम राहें..' या गाण्याच्या ओळी डॉक्टरांनी बाळाला गाऊन दाखवल्या. विशेष म्हणजे त्यावेळी बाळाचं रडणं पूर्णपणे थांबलं होतं. डॉक्टरसाहेब तानसेन झाले असताना इवलंसं बाळ कानसेन झालं होतं आणि डॉक्टरांचं गाणं अगदी तल्लीन होऊन ऐकत होतं.
एनआयसीयूमधील बाळासाठी स्वत: डॉ. अभिनय दरवडे यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्या दिवशीचा अनुभव डॉक्टरांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. 'आमच्या (एनआयसीयू) मधल्या ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! त्यामुळे एनआयसीयू मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होत होता. त्याच रडणं काही थांबेना! मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिन मध्ये)आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं! इवलंसं आहे, पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने!', अशी पोस्ट लिहून डॉक्टरांनी त्यांच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. डॉक्टरांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. जवळपास दीड हजार जणांनी व्हिडिओ लाईक केला असून त्यावर साडेतीनशे जणांच्या कमेंट्स आल्या आहेत. १५ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून जवळपास ४०० जणांनी तो शेअर केला आहे.