आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 05:21 AM2019-07-12T05:21:22+5:302019-07-12T13:45:07+5:30

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत.

Aashadi Ekadashi Special: Baba Maharaj Satarkar's Views On Vitthal Mauli | आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

Next

- हभप बाबामहाराज सातारकर
ज्येष्ठ कीर्तनकार

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी विठूरायाची पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त व देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे. ‘विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचा जीवभाव...’ असा अनुभव येत आहे.
‘विठ्ठल आमुचे जीवन’ असे संतवचन आहे. विठ्ठलाची वारी हे आमुचे जीवन आहे. खरे तर माणसे म्हणतात, ‘मी वारी चालतो.’ मी म्हणतो, वारीमुळे जीवन चालते. वारी ही परमार्थाची भूक; त्यामुळे विठ्ठल आमुचे जीवन आहे, जीवभाव आहे. वारीत विठ्ठलभक्ती आहे तसेच श्रवणसुख आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हा सामाजिक ऐक्याचा संदेशही वारीतूनच दिला जातो.
‘‘धन्य आजि दिन, जाहले संतांचे दर्शन...’ संतांचे दर्शन माणसाला सुख देणारे असते. समाधान देणारे असते.
‘जे जे भेटे भूत ।
ते ते मानिजे भगवंत।।’
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी इतरांसाठी भक्तियोग आणला.
‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी...’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माउली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे, हा वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. वारीनेच सामाजिक क्रांती घडविली आहे. लाखो भाविकांना कोणी न बोलावता ते या सोहळ्यात सहभागी होतात. त्यात सख्या पांडुरंगाची भेट, आतुरता, उतावीळता, जिव्हाळा असतो. परमात्म्यास बद्ध करण्याची ताकद वारीतील भक्तीत आहे. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे
‘विठ्ठल टाळ। विठ्ठल दिंडी।।
विठ्ठल तोंडी उच्चारा। आणि शेवटी
विठ्ठल अवघा भांडवला।।


असा भाव वारीतील प्रत्येका ठायी असतो. पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचार आणि विचार धर्म आहे. ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. त्याचेच दर्शन आपल्याला वारीच्या सोहळ्यात होत असते.
माणसं वारीत आली की एकमेकांना माउलीशिवाय बोलत नाहीत. माउली-तुकोबांचा हा सामाजिक आध्यात्मिक सिद्धांत आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म...’ हा अनंतकाळापासून चालत आला आहे. त्याला पुंडलीक व माउलींच्या काळापासून मूर्तरूप आले आहे.
मी विनोदानं नेहमी सांगत असतो, माणूस वैैकुंठाला गेला, की परत येत नसतो. आम्ही वर्षातून तीन वेळा जातो आणि वैैकुंठाला जाऊन परत येतो.
भूवैैकुंठ म्हणे तुका ।
अधिक अक्षरे आली एका ।।
भूवैैकुंठ म्हणे तुका।। म्हणून एकदा मला एका व्यक्तीने विचारले, ‘इतके दिवस दिसला नाहीत?’ त्यावर मी म्हटले, ‘वैैकुंठवासी होतो.’ त्यावर तो मनुष्य माझ्या तोंडाकडे पाहून अवाक् झाला आणि म्हणाला, ‘हे काय महाराज बोलताय! वैकुंठवासी म्हणजे काय?’ त्यावर मी त्याला म्हटले, ‘वैैकुंठ म्हणजे पंढरपूर.’
हे पाहा, जिथे राष्ट्रपती राहतात ते त्या देशाचे मूळ स्थान असते. खरंय ना? दिल्ली ही जशी देशाची राजधानी आहे. त्यामुळे प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती तेथे राहतात. म्हणून देशाची ती राजधानी. गव्हर्नर अर्थात राज्यपाल जेथे राहतात, ती राज्याची राजधानी. आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई का? तर तिथे गव्हर्नर राहतात म्हणून. तसं जिथं पांडुरंग राहतो, ते वैैकुंठ होय.
वैैकुंठ वैैकुंठ नव्हे. म्हणून जिथे पांडुरंग उभा आहे ते आमचे वैैकुंठ आहे. म्हणून आम्ही दरवर्षी तीन वेळा वैैकुंठाला जाऊन परत येतो आणि या भूवैकुंठाचे वैैशिष्ट्य असे आहे, दर्शन झाल्यानंतर माणसाला इतका आनंद वाटतो, तो अवर्णनीयच असतो.
विठ्ठलाचे ते सावळे, सुंदर असे रूप बघितल्यावर डोळ्यांना धारच लागते. काय आश्चर्य आहे पाहा! आस्तिक असू दे वा नास्तिक असू दे; सर्वांना एकच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती मला परवाच म्हणाली, ‘अहो मी पहिल्यांदाच दर्शनाला गेलो आणि माझ्या डोळ्याला धार लागली.’ काय साक्षात्कार आहे! मी म्हणतो, साक्षात्कार नव्हे, तर साक्षात आकार प्रभूचा.
पांडुरंगाची ती मूर्ती नसून साक्षात आकार प्रभूचा आहे, हे कळणं हाच पंढरपूरला झालेला साक्षात्कार आहे.


म्हणून
‘तेथिले तृण आणि पाषाण।
तेही देव जाणावे ।।
असे जेव्हा नामदेवराय म्हणतात, त्यावर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून वारीची वाट चालावी. आपली प्रतीतीसुद्धा एक दिवस या अवस्थेत पोहोचून परिपक्व होईल. आज चंद्रभागेला भरते आले आहे. लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत, भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त आणि देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे.
 

Web Title: Aashadi Ekadashi Special: Baba Maharaj Satarkar's Views On Vitthal Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.