भारतीय लोकशाहीचा मानबिंदू असणाऱ्या संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही. बावीस वर्षांपूर्वी (१३ डिसेंबर २००१ रोजी) संसदेच्या जुन्या भवनावर हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केलेला हल्ला खूप गंभीर होता. नवी संसद भवनाची इमारत उभारल्यानंतर प्रथमच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे, अशी घटना घडली. सहा तरुणांनी एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहून नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून संसदेत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्नही गंभीर आहे. जुन्या संसद भवनावरील हल्ला परदेशातून घुसखोरी करून आलेल्या अतिरेक्यांनी केला होता. त्यात सहा सुरक्षारक्षकांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती. त्या चकमकीत पाचही अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. मात्र, संसद भवन या अतिसंवेदनशील परिसरापर्यंत शस्त्रास्त्रे घेऊन अतिरेक्यांनी जाणे हाच मोठा धक्का होता. त्याप्रमाणे या सहा तरुणांनी नव्या संसद भवनात घुसखोरी करून सभागृहात जाण्याचा रचलेला कटही अतिगंभीर आहे. संसद भवनातील लोकसभा किंवा राज्यसभेचे कामकाज पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जातो. जेणेकरून आपल्या नागरिकांना संसदेचे कामकाज पाहता यावे. या संसद भवनातील लोकसभा किंवा राज्यसभेच्या प्रेक्षक गॅलरीपर्यंत जाण्यासाठी ठिकठिकाणी चारवेळा तपासणी होते.
तत्पूर्वी, अशा प्रकारच्या प्रवेशासाठी विद्यमान किंवा माजी खासदारांची शिफारस घेऊन संसद सचिवालयाच्या कार्यालयाकडून पास घ्यावा लागतो. आत प्रवेश करताना कोणतीही वस्तू घेऊन जाता येत नाही. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहापैकी दोघांनाच पास मिळाले होते. त्यासाठी म्हैसूरचे भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची शिफारस घेतली होती. या दोघांपैकी एक जण मनोरंजन डी. हा म्हैसूरचा अभियंता तरुण आहे. त्याच्या वडिलांचा खासदारांशी परिचयदेखील आहे, असे त्यांनीच प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. समाजमाध्यमातून ओळख झालेले हे सहाही संशयित तरुण वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. महाराष्ट्राच्या लातूरमधील अमोल शिंदे, हरयाणाची नीलमदेवी, लखनौचा सागर शर्मा, गुरुग्रामचा विक्रम शर्मा आणि सहावा ललित जो फरार आहे, त्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. सागर शर्मा आणि मनोरंजन डी. यांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकून लोकसभेच्या सभागृहात प्रवेश केला तेव्हा हंगामा झाला. या दोघांना पंचेचाळीस मिनिटेच प्रेक्षक गॅलरीत बसण्याची अनुमती होती. मात्र, ते दोन तास बसून असतानाही सुरक्षा रक्षकांच्या लक्षात कसे आले नाही? या दोघांनीही आपल्या बुटामध्ये स्मोक क्रैकर ठेवले होते. सुरक्षा तपासणी होताना, त्याचा सुगावा सुरक्षा रक्षकांना कसा लागला नाही? प्रेक्षक गॅलरी आणि सभागृहाचा मजला इतक्या कमी अंतरावर आहे का, जेथून सहज उडी मारता येते? प्रेक्षक गॅलरीत आलेल्या नागरिकांवर सातत्याने सुरक्षा रक्षकांची नजर असते. बसलेल्या खुर्चीतदेखील हालचाल करण्याची मुभा नसते, असे निबंध असताना सागर आणि मनोरंजन हे दोघे उठून खाली उतरेपर्यंत सुरक्षा रक्षकांचे लक्ष कसे नव्हते, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोघांनाच आत प्रवेश मिळाल्याने अमोल शिंदे आणि नीलमदेवी संसदेच्या समोर घोषणाबाजी करीत होते. त्यांनीदेखील स्मोक क्रैकरचा वापर करून पिवळ्या रंगाचा धूर सोडला होता. याचाच अर्थ हे सर्व जण मिळून कटकारस्थान रचूनच आले होते. संसद भवनाच्या परिसरात अनेक अतिसंवेदनशील इमारती आहेत. तो संपूर्ण परिसर जमावबंदीखाली असतो. तरीदेखील या दोघांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणे, हे स्वीकारार्ह नाही. 'तानाशाही नहीं चलेगी', शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आदी समस्यांवर ते घोषणा देत होते. 'भारत माता की जय'च्या घोषणाही दिल्या. देशातील आर्थिक, राजकीय समस्यांनी अस्वस्थ असणे समजू शकते. मात्र, त्याचा निषेध नोंदविण्याचा किंवा काही मागण्या करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. राजधानीत अनेक समाज घटकांकडून तसेच राजकीय पक्षांकडून विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने होत असतात. राजधानी दिल्लीला हे नवीन नाही. पण, संसदेच्या इमारतीत घुसखोरी करून हिंसात्मक पद्धतीने आंदोलन करणे अत्यंत गैर आहे. तानाशाहीचा निषेध म्हणत निदर्शकांनी लोकशाहीविरोधी कृत्य करणे कसे स्वीकारार्ह होईल? संसद भवनाला दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असताना हे घडणे लाजिरवाणे आहे. आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेने जगात एक मान मिळविला आहे. त्या प्रतिष्ठेला अशा वेडाचारी कृत्याने धक्का पोहोचला आहे. देशाच्या प्रतिष्ठेस नख लागत आहे.