अहिंसेचा जागर नवरात्रोत्सवाचे मंगल पर्व ख-या अर्थाने शक्तिदायी करेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:57 AM2017-09-21T01:57:14+5:302017-09-21T01:57:16+5:30
लोकांच्या आहार पद्धतीबाबत भारतीय घटनेने स्वातंत्र्य दिलेले आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; पण त्याला धार्मिकतेची जोड देऊन पशुबळीसारख्या पद्धतीचे समर्थन केले जाते ते अनाकलनीय, अविवेकी आणि गैर आहे.
विजय बाविस्कर।
लोकांच्या आहार पद्धतीबाबत भारतीय घटनेने स्वातंत्र्य दिलेले आहे. याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; पण त्याला धार्मिकतेची जोड देऊन पशुबळीसारख्या पद्धतीचे समर्थन केले जाते ते अनाकलनीय, अविवेकी आणि गैर आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अनेक देवस्थानांनी स्वत:हून ही पद्धत बंद केली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी चळवळ उभारली. मात्र, अजूनही ही अनिष्ट प्रथा सुरू असणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणा-या समाजासाठी निश्चितच भूषणावह नाही.
नवरात्राचा उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. आदिमायेची आराधना. परंतु याच नवरात्राला काही लोक पशुबळीसारख्या अमानवी प्रथेशी जोडून त्याचे मांगल्य भंग करीत आहेत. शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवस्थानाने यावेळी पशुबळी न देण्याचा स्वागतार्ह, अभिनंदनीय निर्णय घेतला आहे. सर्वच देवस्थानांनी या निर्णयाचे अनुकरण करण्याची गरज आहे. अजबली प्रथेच्या विरोधात सामाजिक आणि न्यायालयीन लढाई लढणारे डॉ. गंगवाल म्हणतात, की नवरात्रात खंडेनवमीच्या दिवशी अजबली देण्याची प्रथा आहे. मात्र, या प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. त्यामुळे पशुबळी बंद करण्यासाठी कायदाच करण्याची गरज आहे. वैद्यकीय आणि वाहतुकीच्या सुविधा नसताना आजारातून आराम पडावा, यासाठी ग्रामदेवतेला नवस बोलण्याची पद्धत होती. प्रत्येक गावात ग्रामदेवतेची पूजा केल्यावर गावाचे संरक्षण होते, असा समज आहे. पशुबळी यातीलच एक दुष्ट रूढी. बळीचा नैवेद्य देवाला, काही भाग पुजा-याला आणि अन्य भाग कुटुंब व नातेवाइकांसाठी मेजवानी ठरते. नवसपूर्तीच्या नावाखाली अमानुष पद्धतीने हजारो पशूंचा बळी दिला जातो. परिसरात पडलेल्या रक्त-मांसामुळे अस्वच्छता, अनारोग्य निर्माण होते. पिढ्यान् पिढ्या सुरू असलेल्या या रूढींविरोधात अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. संत गाडगेबाबांसारख्या समाजसुधारकांनी यावर कोरडे ओढले. ‘सावकाराकडून कर्ज काढून पशुबळी देऊन कोणती मन:शांती मिळणार आहे’, असा सवाल विचारवंत करतात. कोणत्याही संताने कधीही पशुबळीचे समर्थन केले नाही; उलट भागवतधर्माची पताका फडकवत संतांनी गावेच्या गावे माळकरी म्हणजेच शाकाहारी केली. धार्मिक आणि सांस्कृतिक रूप देऊन यात्रा सुरू झाल्या. त्यातील जेवणावळींतून सामाजिक प्रतिष्ठा मोजली जाऊ लागली. वाईजवळील मांढरदेवीच्या यात्रेत हजारो बळी दिले जायचे. यातूनच २००५मध्ये यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३५०हून अधिक बळी गेले. त्यानंतर मांढरदेवी देवस्थानाने पशुबळीवर बंदी घातली. डॉ. कल्याण गंगवाल यांना काही जण प्रश्न विचारतात, की केवळ हिंदू धर्माच्या प्रथांवर का बोलता? याला त्यांचे उत्तरही अत्यंत समर्पक आहे. ‘‘धर्माचा प्रश्नच नाही़ प्रत्येक धर्मात अहिंसा सांगितली आहे़ यंदा मुस्लीम धर्मातील ४२ कुटुंबांनी बकरी ईदच्या दिवशी पशुबळी दिला नाही़ त्यांनी स्वत:च्या मनाने हा निर्णय घेतला आहे़’’ गंगवालांची ही चळवळ यशस्वी झाली तर ख-या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार होईल आणि समाजाचे कल्याण होईल. अहिंसेचा हा जागर नवरात्राचे पर्व अधिक शक्तिदायी करेल.