भुताने झपाटल्याची किंवदन्ती नाही, असे गाव भारतात शोधूनही सापडायचे नाही! केवळ भुतेच नाही तर इतरही अनेक गोष्टी भारतीयांना सतत झपाटत असतात. मग कधी तो चित्रपटसृष्टीतील एखादा सुपरस्टार असतो, तर कधी एखादा क्रिकेट खेळाडू असतो. कधी एखादा ‘ब्रँड’ही आम्हाला झपाटतो, तर क्वचित एखादा राजकीय नेताही! भुताने झपाटले, की ते मानगुटीवर बसते आणि सहजासहजी सोडत नाही, असे म्हणतात. आम्हा भारतीयांना मात्र कोणत्याही गोष्टीने झपाटले, की आम्हीच तिला लवकर आमच्या मानगुटीवरून उतरू देत नाही! वर्षानुवर्षांपासून भारतीयांना झपाटलेल्या गोष्टींच्या यादीत अमेरिका या देशाचे स्थान खूप वरचे आहे. त्या देशाविषयी एक अनामिक सुप्त आकर्षण बहुतांश भारतीयांच्या मनात असतेच असते! तशी अमेरिकेविषयी आकस बाळगणाऱ्या भारतीयांची संख्याही कमी नाही; मात्र त्या आकसामागेही कुठे तरी अमेरिकेविषयीचे ते सुप्त आकर्षण असतेच! संधी मिळाल्यास कोणत्या देशाला भेट द्यायला आवडेल, असा प्रश्न केल्यास, ९९.९९ टक्के भारतीयांचे उत्तर अमेरिका हेच असेल!
अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण हे झपाटलेपण पुन्हा एकदा अनुभवले. अमेरिका वगळता जगातील इतर एकाही देशात, भारतात झाली तेवढी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची चर्चा झाली असेल, असे वाटत नाही. जगातील इतरही अनेक लोकशाहीप्रधान देशांमध्ये निवडणुका होतात; मात्र त्या देशांमधील निवडणुकांची एवढी चर्चा भारतात कधीच होत नाही. त्यामागचे एकमेव कारण हेच, की अमेरिकेने आम्हाला अक्षरश: झपाटून टाकले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा आपण अमेरिकेविषयीच्या झपाटलेपणाची अनुभूती घेत आहोत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेले ‘ए प्रॉमिस्ड लॅण्ड’ हे पुस्तक मंगळवारपासून विक्रीस उपलब्ध होत आहे. ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळातील अनुभवांवर आधारित या पुस्तकात, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सध्या भारतात बराच गदारोळ सुरू आहे. एखाद्या विद्यार्थ्याने भरपूर अभ्यास केला असावा आणि शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी तो उत्सुक असावा; मात्र त्याच्यात मुळातच विषयात नैपुण्य मिळविण्यासाठी आवश्यक त्या योग्यता वा आवडीचा अभाव असावा, तसे राहुल गांधी यांचे चिंताक्रांत, अविकसित व्यक्तिमत्त्व आहे, अशा आशयाचे विधान ओबामा यांनी केले आहे. राहुल गांधींना हिणविण्याच्या संधीच्या शोधातच असलेल्या भारतीय जनता पक्षाने ओबामांच्या विधानाचे भांडवल केले नसते तरच नवल! काँग्रेस पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करणेच इष्ट ठरले असते; पण प्रतिवाद करण्याचा मोह काँग्रेसलाही आवरला नाही. आधी तर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला ओबामांच्या वक्तव्यावर आधारित बातम्यांसाठी प्रसारमाध्यमांवरच घसरले. नंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भाजपाचे उट्टे काढण्यासाठी आधार घेतला तो ओबामांच्या पुस्तकाचाच!
ओबामांनी पुस्तकात माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांची प्रशंसा केली आहे; मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तर साधा नामोल्लेखही केला नाही, या शब्दात थरूर यांनी परतफेड केली. सत्तेच्या खेळातील प्रतिस्पर्धी असलेल्या दोन राजकीय पक्षांमधील चढाओढ समजण्यासारखी आहे; मात्र विरोधी पक्षाच्या नेत्याचा उपमर्द करण्यासाठीही परक्या देशाच्या माजी राष्ट्रप्रमुखाने केलेल्या वा न केलेल्या वक्तव्यांचा आधार घेतला जात असेल, तर त्याला झपाटलेपणाचा आणखी एक आविष्कारच म्हणावे लागेल! अमेरिकेकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत; परंतु दुर्दैवाने, अमेरिकेने एवढे झपाटून टाकले असूनही, अमेरिकेच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात मात्र आम्ही कमी पडतो आणि नसत्या गोष्टींच्या मागे लागतो! अमेरिका हा संपूर्णपणे व्यापारी मानसिकतेचा देश आहे. त्या देशात राष्ट्राध्यक्ष कोणत्याही विचारधारेचा असो, धोरणे केवळ अमेरिकेचे हित सर्वतोपरी मानूनच राबविली जातात.
रशियाला रोखण्यासाठी पाकिस्तान महत्त्वाचा होता, म्हणून कालपर्यंत अमेरिका पाकिस्तानचा मित्र होता. आज चीनला रोखण्यासाठी भारत गरजेचा वाटतो, म्हणून भारत अमेरिकेचा ‘नैसर्गिक मित्र’ आहे! जर लोकशाही राष्ट्र म्हणून भारत अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे, तर लष्करी वर्चस्व असलेला पाकिस्तान मित्र का होता, हा प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही. आपण हे केवळ समजून घेण्याचीच नव्हे, तर देशहिताच्या दृष्टीने आत्मसातही करण्याची गरज आहे. तसे झाले तरच आपले एवढ्या वर्षांचे झपाटलेपण सत्कारणी लागले, असे म्हणता येईल!