अमेरिकी चोंबडेपणा
By admin | Published: October 16, 2015 09:59 PM2015-10-16T21:59:34+5:302015-10-16T21:59:34+5:30
गेल्या काही दिवसांपासून भारतात धार्मिक असहिष्णुतेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’
गेल्या काही दिवसांपासून भारतात धार्मिक असहिष्णुतेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ या विषयावरील अमेरिकन आयोगाच्या ताज्या अहवालातही भारतात धार्मिक असहिष्णुता वाढीस लागल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिकन सरकारने गठित केलेला हा आयोग विदेशांमधील धार्मिक व श्रद्धा स्वातंत्र्याच्या जपणुकीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी बुधवारी जारी केलेल्या २०१४ च्या अहवालात भारताचा समावेश ‘टिअर टू’ देशांच्या यादीत करण्यात आला असून पाकिस्तान ‘टिअर वन’ देशांच्या यादीत आहे. धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अत्यंत गंभीर असलेल्या देशांचा समावेश ‘टिअर वन’ यादीत, तर चिंताजनक स्थिती असलेल्या देशांचा समावेश ‘टिअर टू’ यादीत असतो. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासूनच अमेरिकेने जगाच्या पोलिसाची भूमिका स्वत:कडे घेतली असून चोंबडेपणा हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी जणू शपथच घेतली आहे. भारतीय समाज अनेक जाती, पंथ, धर्मांमध्ये विभागला गेल्याने येथे जातीय व धार्मिक तेढ निर्माण होतच असते. तुलनेत अमेरिकन समाज धार्मिक आधारावर विभागला गेला नसतानाही त्या देशाला वंशविद्वेषाचा मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर भारताला गुलामगिरीचा इतिहास लाभलेला नाही आणि गुलामगिरीचा डाग जातीय व धार्मिक हिंसाचारापेक्षा मोठा व गडद असतो. भारताला जातीय व धार्मिक हिंसाचाराच्या इतिहासासोबतच धार्मिक सहिष्णुतेचा त्यापेक्षाही मोठा इतिहास लाभला असल्याचे विस्मरण कोणालाही होता कामा नये. मध्ययुगीन कालखंडात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्याही धर्म वा पंथाच्या अनुयायांवर अत्त्याचार झाले, तेव्हा त्यांनी भारताचाच मार्ग धरला आणि भारतीयांनीही त्यांना उदार मनाने सामावून घेतले, हा इतिहास आहे; मग ते पारशी असतील, ज्यू असतील किंवा आणखी कोणत्या धर्म वा पंथाचे असतील! आश्रयाला आलेल्यांना तर भारतीयांनी आश्रय दिलाच; पण शक, हुणांपासून तूर्क व मोगलांपर्यंतच्या आक्रमकांनाही उदार मनाने सामावून घेतले. याउलट अमेरिका हा देश ज्या युरोपियनांनी उभारला, त्यांच्या पूर्वजांनी ‘क्रुसेड’च्या माध्यमातून युरोपातून इस्लाम धर्माचे नामोनिशाण मिटवून टाकले होते, हे अमेरिकेने विसरायला नको.