- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)
‘खोट्या दरोड्याचा प्रँक करताना घाबरलेल्या लोकांच्या गोळीबारात तरुण ठार’, - ही बातमी ऐकून इंद्राच्या दरबारात सन्नाटा पसरला. काही जण गोंधळून गेले..
‘नारदा... हा काय प्रकार?’ इंद्रांनी विचारताच मुनी बोलू लागले, ‘एखाद्या घटनेचा खोटा बनाव करून समोरच्याला वेड्यात काढणं, याला प्रँक म्हणतात. आज-काल ज्याचा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल, तो प्रँक सर्वांत सक्सेसफुल्ल.’ दरबाराला यातलं किती समजलं, हे मुनींच्या लक्षात आलं नाही. तेवढ्यात इंद्रांनी पुढचा प्रश्न टाकला, ‘भूतलावरील राजकीय नेतेही प्रँक करतात का कधी? शोध घ्या, या पॉलिटिकल प्रँकचा.’.... मग काय.. वीणा वाजवत मुनी भूतलावर उतरले.
सुरुवातीला त्यांना नवी मुंबईत गणेशदादा भेटले. दादांच्या दोन्ही हातात चार मोबाइल होते. सारे सतत बिझी. एक कॉल बंद होईपर्यंत दुसरा वाजत होता. तिसरा कॉल सुरू होईपर्यंत चौथा लागत होता. ‘दादा.. आम्ही आता तुम्हाला सोडून चाललोय’, असं कॉल करून सांगणाऱ्या त्यांच्या पालिका मेंबरची संख्या वाढतच चाललीय की काय, अशी दाट शंका मुनींना आली. तेव्हा दादांचा पीए कानात कुजबुजला, ‘आमच्या दादांना अनेक इंटरनॅशनल डॉनचे संतापानं फोन येताहेत. तुमच्या गल्लीबोळातल्या पालिका निवडणुकीत आम्हाला का विनाकारण ओढताय म्हणून.. साहेबांचा प्रँक आता त्यांच्याच अंगलट आलाय बघा.’
मुनी तिथून सटकले. टोलनाक्याजवळ ‘नितेश मालवणकर’ जळगावच्या नाथाभाऊंशी तावातावानं बोलत होते. ‘मी कमळवाल्यांना कसं प्रँक केलं’, हे कौतुकानं सांगणाऱ्या ‘नाथाभाऊं’ना ‘कोकण’वाले खडसावून म्हणाले, ‘एका पार्टीला प्रँक केलं म्हणजे लय भारी झालं का? आमच्याकडे बघा.. आम्ही प्रत्येक निवडणुकीत एका नव्या पार्टीला वेड्यात काढतो. रोज जेवढं ट्विट करत नाही, त्याहीपेक्षा जास्त पक्ष बदलतो.’
मुनी पुढं निघाले. ‘कृष्णकुंज’वर रोज सकाळी लवकर उठून बॅडमिंटन खेळणारे ‘राज’ एकदम फ्रेश दिसत होते. त्यांना प्रँकबद्दल विचारलं तेव्हा ते गालातल्या गालात हसत उत्तरले, ‘गेल्या सव्वा वर्षापासून मीसुद्धा याच प्रँकचा विचार करतोय. ट्रिपल सरकारमधल्या तीन पार्ट्या एकमेकांना प्रँक करताहेत की तिघे मिळून जनतेला, याचाच शोध घेतोय.’
नारद दचकले. त्यांनी ‘मातोश्री’वर आदित्यराजेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी संजयराव आपल्या जाकिटाच्या बटणाशी चाळा करत त्यांना औरंगाबादच्या प्रँकचा किस्सा रंगवून-रंगवून रोख-ठोकपणे सांगत होते. ‘आपण गावच्या नामांतराचा प्रँक खूप जोरात केला बरं का.. तिकडून हातवाल्या थोरातांनीही आपल्याला चांगली साथ दिली. हा प्रँक पाहताना बिचारे लोक लाइट बिलाचा विषयच विसरून गेले. सोशल मीडियावरही केवळ नामांतराचा मुद्दा मांडण्यातच रंगले.’
मुनींनी डोळे विस्फारले. मग त्यांनी साताऱ्याची वाट धरली. खिशाला ‘कमळ’ लावून फिरणाऱ्या दोन्ही राजेंची भेट घ्यावी, असं त्यांना उगाचंच वाटलं. मात्र, ‘सुरूची’वर गेल्यावर कळलं की धाकटे राज म्हणे नेहमीप्रमाणं अजितदादा बारामतीकरांना भेटायला गेलेले. ‘जलमंदिर’वर सांगितलं गेलं की, थोरले राजेही म्हणे थोरले काका बारामतीकरांशी चर्चा करण्यात रमलेले. मुनी पुरते बावचळले. हे दोन्ही ‘राजे’ नेमकं ‘कमळ’वाल्यांना प्रँक करताहेत की ‘काका-पुतणे’ या दोघांना फिरवताहेत, असा प्रश्न नारदांसमोर उभा ठाकला.त्यांनी थेट नागपुरात देवेंद्रपंतांची गाठ घेतली. ‘तुम्हाला म्हणे दिल्लीवाल्यांनी प्रँक केलंय. तुम्ही नको म्हणून पुन्हा सत्ता येऊ दिली नाही, हे खरं का?’
असं विचारताच पंत गालाला खळी पाडत खुदकन् हसले, ‘हा प्रँक दिल्लीचा नव्हे हो, बारामतीचा होता. थोरल्या काकांना कमळ हवं होतं, पण मी नको होतो. म्हणून मीच शेवटी गुपचूप प्रँक केला. मी नाही, तर सत्ताही नाही. बसा ओरडत.. काय?’ - नारद मुनी गुपचूपपणे परत फिरले. नारायणऽऽ नारायणऽऽ