लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश असला तरी, राजकीय पक्षांना ती आतापासूनच खुणावू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला तीन-चतुर्थांश बहुमत मिळाल्यानंतर लगेच २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीची चर्चा सुरू झाली. रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ती आणखी पुढे नेली. भाजपाला ‘संपविण्यासाठी’ एकत्र येण्याचे आवाहन, त्यांनी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाला केले. बिहार विधानसभा निवडणुकीत, राजद, कॉँग्रेस व संयुक्त जनता दलाच्या महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे लालूप्रसाद यादव खूपच उत्साहित झाले आहेत. बिहारमधील निकालापासून, भाजपाला लोळविण्याचा मूलमंत्रच गवसल्यासारखी त्यांची देहबोली असते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीही त्यांनी सपा, बसपा व कॉँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यासाठी सक्रिय पुढाकारही घेतला होता. त्यापैकी सपा व कॉँग्रेस एकत्र आले; पण बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही लालूप्रसादांचे आवाहन मनावर घेतले नाही. अर्थात उत्तर प्रदेशातील निकालानंतर मुलायम सिंह व अखिलेश यादव या पितापुत्रांएवढ्याच मायावतीही हादरल्या आहेत. कॉँग्रेसमधूनही विरोधी पक्षांच्या एकतेसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा आग्रह सोडून देण्याचे सूर उमटू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार असलेल्या कर्नाटक व गुजरात या दोन मोठ्या राज्यांनी भाजपाला कौल दिल्यास, कॉँग्रेसमधील हा सूर मोठा होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इतर सगळे असा दुरंगी सामना रंगण्याची शक्यता दिसत आहे. १९७७ मध्ये तत्कालीन सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉँग्रेसच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जन्माला घातलेल्या जनता पक्षाला तेव्हा जनतेने भरघोस कौल दिला होता आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉँग्रेसला केंद्रातून सत्ताभ्रष्ट केले होते; पण अवघ्या अडीच वर्षातच जनता पक्ष फुटला होता आणि १९८० मध्ये जनतेने पुन्हा कॉँग्रेसला सत्ता दिली होती. त्यानंतर विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रयोग १९८८मध्ये जनता दलाच्या नावाने झाला होता. त्या पक्षालाही सत्ता मिळाली; पण टिकवून ठेवता आली नाही. ते दोन्ही प्रयोग कॉँग्रेसच्या विरोधात झाले होते आणि भाजपा (पूर्वाश्रमीचा जनसंघ) त्यामध्ये आतून वा बाहेरून सहभागी झाला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रयोग, अर्थात नवा पक्ष नव्हे तर आघाडी स्थापन करून, भाजपाच्या विरोधात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग होणार का, आधीच्या दोन प्रयोगांप्रमाणे तोदेखील यशस्वी होणार का आणि झाला तरी त्याची गत आधीच्या प्रयोगांप्रमाणेच होणार का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
भाष्य - पुन्हा विरोधी ऐक्य?
By admin | Published: March 28, 2017 12:23 AM