भाष्य - वाचाळवीरांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 12:53 AM2017-03-29T00:53:49+5:302017-03-29T00:53:49+5:30
योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी
योगी आदित्यनाथ हे आजवर त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा विखारी वक्तव्यांमुळेच सर्वांना अधिक परिचित राहिले. आता मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यावर त्यांनी अत्यंत समजूतदारीची भाषा बोलणे सुरू केले आहे. अर्थात हे किती वरकरणी आहे आणि किती मनापासून ते पुढील काळात कळेलच. पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षातील काही उपटसुंभांनी मात्र समाजात विखार कायम राखण्याचा विडाच उचललेला दिसतोय. या पक्षाचे खटौली येथील आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे हे महाशय २०१३च्या मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आहेत. वंदेमातरम् म्हणण्यास नकार देणारे, भारतमातेचा जयघोष करण्यास उत्सुक नसलेले आणि गाईला माता न मानता तिची हत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि यासाठी आम्ही कार्यकर्त्यांची एक फळीच तयार केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य या आमदाराने केले आहे. या चिथावणीखोर विधानाबद्दल त्यांचा पक्ष अथवा वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची कानउघडणी होण्याची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. गेल्या काही वर्षातील भाजपाच्या कार्यशैलीचे हे एक वैशिष्ट्य राहिले आहे. या पक्षाकडे वाचाळवीरांची मोठी फौजच आहे. सुब्रमण्यम स्वामी, साक्षी महाराज, गिरीराज सिंह, साध्वी निरंजन ज्योती, साध्वी प्राची अशी कितीतरी नावे घेता येतील. बड्या नेत्यांनी सामंजस्याची भाषा करून लोकांना मोहीत करायचे आणि या वाचाळवीरांनी धाकधपटशा करीत पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटायचा. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी असेच बेताल वक्तव्य करून आपल्या मुख्यमंत्र्यांनाच घरचा अहेर दिला होता. संकुचित अस्मिता उभ्या करून माणसामाणसात फूट पाडणे, मनमानीपणे समाजाला कोणत्याही दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हे चांगल्या नेत्यांचे लक्षण नव्हे हे या वाचाळवीरांना कोण सांगणार? अभिनेता शाहरूख खानची पाकिस्तानी दहशतवादी हाफीज सईदशी तुलना करून त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणारे आदित्यनाथ तर हे करू शकणार नाहीत. अशात या वाचाळवीरांमुळे त्यांचे नव्या उत्तर प्रदेशचे स्वप्न भंग होऊ नये एवढेच !