हेमंत लागवणकर
सजीव सृष्टीच्या उत्तम आरोग्यासाठी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या भूभागापैकी किमान ३३ टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे, पण वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर वाढणारा ताण, यामुळे पृथ्वीवरचे वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याची चिंता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करताना दिसतात. सध्या पृथ्वीच्या एकूण भूभागाचा विचार केला, तर सुमारे ३० टक्के भूभाग वनाच्छादित आहे. जास्त वनक्षेत्र असलेल्या काही देशांमध्ये प्रामुख्याने ब्राझिल (५६ टक्के), काँगो (५२ टक्के), इंडोनेशिया (४६ टक्के) आणि रशिया (४५ टक्के) यांचा समावेश होतो. आपल्या शेजारी असलेल्या नेपाळचा ४४ टक्के भूभाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. अमेरिकेत हेच प्रमाण सुमारे ३१ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचा किती टक्के भूभाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे, असा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे उत्तर आशादायक आहे.
अंतराळ संशोधन क्षेत्रात जगात अग्रणी असलेल्या ‘नासा’ या अमेरिकेच्या संस्थेने जगभरात किती वनक्षेत्र आहे, याचा उलगडा करणारे उपग्रहाच्या मदतीने घेतलेले छायाचित्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, सुमारे वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या अशाच प्रकारच्या छायाचित्राशी याची तुलना केली, तर भारत आणि चीन या देशांतील वनक्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण जगात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या या दोन देशांमध्ये वनक्षेत्रात वाढ होत असल्याची गोष्ट निश्चितच सुखावणारी आहे.गेली वीस वर्षे पृथ्वीभोवती घिरट्या घालणाºया ‘नासा’च्या दोन उपग्रहांवर बसविण्यात आलेल्या ‘मॉडरेट रिझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर’ या उपकरणाच्या मदतीने पृथ्वीची सातत्याने छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या छायाचित्रांवरून केलेले संशोधन नुकतेच ‘नासा’तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
१९७० आणि १९८०च्या दशकांत भारत आणि चीन या दोन्ही देशांत सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय क्षेत्रांमध्ये बरीच स्थित्यंतरे झाली. या दरम्यान दोन्ही देशांमधली लोकसंख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. याचे भले-बुरे परिणाम झाले. वाईट परिणामांमध्ये आढळलेला सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा ºहास. १९९०च्या दशकापासून अनेक स्तरांमधून याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न केले गेले आणि गेल्या वीस वर्षांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात झाली. हे काम यशस्वितेच्या मार्गावर असल्याची पावती ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रामुळे मिळाली आहे. अर्थात, वनक्षेत्रात झालेली वाढ आपल्याही उपग्रहाने टिपली आहे; ‘नासा’च्या छायाचित्राने त्यावर शिक्कामोर्तब झाले़
पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये केवळ १९ टक्के भूभाग वनाच्छादित होता, पण आता हेच प्रमाण २१ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. एकूण भूभागाच्या २३ टक्के भूभाग वनक्षेत्राखाली आणण्याचे चीनचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांनी चौºयाऐंशी हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वृक्ष लागवड करण्याची मोहीम हातात घेतली आहे. यासाठी चीनने साठ हजार सैनिकांना वृक्ष लागवडीच्या कामाला लावले आहे. याउलट आपल्या देशात मात्र वृक्ष लागवड ही लोकसहभागातून केली जात आहे, हे महत्त्वाचे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात देशात आघाडीवर आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये भारतातल्या वनक्षेत्रात एक टक्क्याची वाढ झाली आहे. एवढी वाढ होणे ही एक मोठी उडी आहे. सध्या आपल्या एकूण भूभागापैकी २४ टक्क्यांपेक्षा जास्त भूभागावर वनक्षेत्र आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत आपल्या देशाचा क्रमांक दहावा लागतो. पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळणे ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
वृक्ष लागवड करून ज्याप्रमाणे वनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, त्याचप्रमाणे असलेली वनसंपदा टिकवण्याच्या दृष्टीनेही आपल्या देशात प्रयत्न केले जात आहेत. वनक्षेत्रामध्ये लावल्या जाणाºया आगींवर, वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडून व्यापक प्रयत्न होत असले, तरी त्याला पुरेसे यश मिळत नव्हते. अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे वन कर्मचारी वणव्यांपुढे हतबल होते, पण २०१२ पासून उपग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील वणव्यांवर नजर ठेवायला सुरुवात झाली. उपग्रहाच्या माध्यमातून ‘रिअल टाइम फॉरेस्ट फायर मॉनेटरिंग योजना’ कार्यान्वित झाल्यामुळे आग लागल्याच्या घटनेच्या काही क्षणांतच परिसरातील वन अधिकाºयांच्या मोबाइलवर आगीचे ठिकाण अक्षांश आणि रेखांक्ष पोहोचविले जातात. लोकसहभाग, सरकारी यंत्रणा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ झाल्याने वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत आशादायी चित्र निर्माण झाले आहे, हे नक्की. (लेखक विज्ञान प्रचारक आहेत)