शेतकरी हे ‘ग्राहक’ असतात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:30 AM2022-06-21T05:30:06+5:302022-06-21T05:30:43+5:30
Consumer Forum: बियाणे, खते आणि कीटकनाशके याबाबतीत फसवणुकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन व्ही. एम. मधुसूदन रेड्डी या प्रकरणात दिलेल्या निवाड्याने याबाबतची संदिग्धता संपवून शेतकरी ग्राहकांना ग्राहक कायद्याचा मार्ग पूर्णतः खुला करून दिला आहे.
- - दिलीप फडके
(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते )
शेतकरीग्राहक असतात का? खते, बियाणे यांच्या संदर्भात होणाऱ्या फसवणुकीबद्दल ते काय करू शकतात ? - एक वाचक
बियाणे, खते आणि कीटकनाशके याबाबतीत फसवणुकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन व्ही. एम. मधुसूदन रेड्डी या प्रकरणात दिलेल्या निवाड्याने याबाबतची संदिग्धता संपवून शेतकरी ग्राहकांना ग्राहक कायद्याचा मार्ग पूर्णतः खुला करून दिला आहे. आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या संदर्भात वेगवेगळ्या निकालांच्या वैधतेला कॉर्पोरेशनने आव्हान दिले होते. ह्या कंपनीने उत्पादित केलेले बियाणे खराब आहे हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी ग्राहक न्यायमंचांकडे तक्रारी केल्या. शेतकरी हे व्यावसायिक हेतूने बियाण्यांची खरेदी करून त्यापासून ते लाभ मिळवीत असतात. बियाण्यांबद्दलच्या तक्रारींच्या निराकरणासाठी स्वतंत्रपणे बियाण्याचा कायदा (१९६६) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्राहक कायद्याचा आधार घेणे चुकीचे ठरेल, असा कंपनीचा युक्तिवाद होता. शेतकरी व्यावसायिक किंवा वाणिज्य हेतूने बियाणे खरेदी करतात, हा कंपनीचा युक्तिवाद न्यायालयाने साफ नामंजूर केला.
न्यायालयाने सांगितले की, या शेतकऱ्यांना बियाण्यांचा कायदा आणि नियमांचे पुरेसे ज्ञान असणे शक्य नाही. सरकार आणि सरकारी संघटनांनी दिलेल्या माहितीवर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. बियाणे खरेदी केल्यावर त्यातील थोडा नमुना राखून ठेवला पाहिजे, असा सल्लाही न्यायालयाने दिला. बियाण्यांचे नमुने किमान एक वर्षापर्यंत तरी जपून ठेवणे ही उत्पादकांची जबाबदारी आहे.
कायद्यानुसार खराब बियाण्यांच्या संदर्भात उत्पादकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड इतकीच सीमित शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार योग्य नुकसानभरपाई मिळवता येते.
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com